नंदवाळ येथील वारीची तयारी पूर्ण
By admin | Published: July 3, 2017 12:46 AM2017-07-03T00:46:30+5:302017-07-03T00:46:30+5:30
नंदवाळ येथील वारीची तयारी पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
सडोली (खालसा) : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणारे करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठलाची आषाढी एकादशी वारी यात्रा उद्या, मंगळवारी होत असून, या वारी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच सरिता पाटील, जोतीराम पाटील यांनी दिली. या यात्रेदिवशी मंदिर परिसरात नारळ फोडण्यास व गावात डिजिटल फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे
नंदवाळ येथे प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या सुरेख मूर्ती आहेत. हेमाडपंथीय मंदिर पुरातन काळापासून आहे. या मंदिरात प्रतिवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. वारीला सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहत असल्याने प्रचंड गर्दी होते. याचा ताण प्रशासनावर पडतो. याचा विचार करून स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत नंदवाळ व करवीर पोलीस यांच्यावतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती यात्रा कमिटीच्या सदस्यांनी दिली.
यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन रांग स्वतंत्र निर्माण केली असून, मुखदर्शनासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. भाविकांनी आपली वाहने हजारे पेट्रोल पंप आणि वाशी खत कारखाना येथे उभा करून वाशी ते नंदवाळ असा पायी प्रवास करावयाचा आहे. भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे भाविकांना सोयी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी कमी पडतो, तरीही ग्रामपंचायतीच्या कुवतीप्रमाणे खर्च करून भाविकांची सोय केली जाते. तरी यात्रा चांगली व सुविधा मिळण्यासाठी आर्थिक मदत प्रशासनाने करावी, अशी मागणी पंचायतीच्या वतीने करण्यात आली.
करवीर पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, यात्रा महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणे भक्तिमय वातावरणात संपन्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात सुशोभीकरण, सफाई, नंदवाळमधील गटारी साफ करण्यात आल्या आहेत; तसेच पाणी शुद्धिकरण करण्यात आले आहे. आरोग्य पथक २४ तास कार्यरत राहणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत, देवस्थान कमिटीने केले आहे.