हीरक महोत्सवी ‘नॅनो’ गणेशाला थाटात निरोप--नारायण केशव देसाई यांच्या कुटुंबाची आठ दशकांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 06:40 PM2017-09-07T18:40:18+5:302017-09-07T18:44:12+5:30
मुरलीधर कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या साने गुरुजी वसाहतीतील नारायण केशव देसाई यांच्या कुटुंबातील अवघ्या तीन इंच उंचीच्या ‘नॅनो’ गणेशाला नुकताच निरोप देण्यात आला. देसाई कुटुंबात बसविण्यात येणाºया या गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला यावर्षी ८१ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे यंदा या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हीरक महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
अनेक कुटुंबात मोठ्या गणेशमूर्ती बसविण्यामध्ये नेहमी चढाओढ असते. एक फुटापासून साडेतीन, चार फुटांच्या गणेशमूर्ती बसविण्यात येतात. प्रत्येक वर्षी सहा इंचापासून ते एक फुटापर्यंत मूर्तीची उंची वाढविणारेही अनेकजण आहेत. पण नारायण देसाई यांचे कुटुंब मात्र सर्वांपासून अलिप्त आहे. या कुटुंबात गेली ८१ वर्षे अवघ्या तीन इंच उंचीची गणेशाची मूर्ती बसवली जाते. चिखलाच्या गणोबापेक्षाही उंची लहान असलेली ही मूर्ती शाडूपासून बनविली जाते. कुंभार गल्लीतील विलास पुरेकर (कुंभार) यांचे कुटुंब गेली आठ दशके ही मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत.
ही मूर्ती बनविणारी पुरेकर यांची ही चौथी पिढी आहे. गेली ८१ वर्षे मोठ्या श्रद्धेने ते हे काम करीत आहेत. अत्यंत सुबक व देखणी अशी ही मूर्ती हाताने बनवावी लागते. या मूर्तीचे रंगकामही अत्यंत बारकाईने अक्षरश: डोळ्यात तेल घालून करावे लागते. यासाठी छोटे वेगळे ब्रश वापरावे लागतात. ही मूर्ती अत्यंत नाजूक असल्याने तिला खूपच जपावे लागते.मोठेपणाचा सोस बाजूला ठेवत गेली ८१ वर्षे अवघ्या तीन इंच उंचीची मूर्ती बसवून तिला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणाºया देसाई कुटुंबियांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, यात शंकानाही.
रंजक इतिहास
देसाई कुटुंबात ही मूर्ती बसविण्याची प्रथा नेमकी केव्हा सुरू झाली. याचा इतिहास मोठा रंजक आहे. सध्या ८६ वर्षांचे असलेले नारायण केशव देसाई हे जेव्हा अवघ्या पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांकडे मला छोटी गणेशाची मूर्ती पूजेसाठी हवी असा हट्ट धरला होता. छोट्या नारायणाची समजूत घालण्याचा त्यावेळी वडीलधाºयांनी भरपूर प्रयत्न केला. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तेव्हा विलास पुरेकर यांच्या आजोबांनी प्रथम तीन इंचाची गणेश मूर्ती बनवली. पण ही मूर्ती देसाई कुटुंबियांना इतकी आवडली की प्रतीवर्षी त्यांनी अशीच मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला.
तीन इंच उंचीची मूर्ती शाडूपासून बनविणे, तिला रंग देणे हे खूपच अवघड काम आहे. मोठी गणेशमूर्ती बनविण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्या चौपट वेळ ही मूर्ती साकारण्यास लागतो. पण गेली ८१ वर्षे मोठ्या श्रद्धेने हे काम आम्ही करीत आहोत.
- विलास पुरेकर (कुंभार)