अरुंद रस्ते, तुडुंब वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:50 AM2017-11-01T00:50:32+5:302023-09-05T13:23:08+5:30
तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा ...
तानाजी पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा मार्ग पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडताना तो कोल्हापूर शहरातून जातो. त्यामुळे त्यावरील वाहतुकीचा प्रचंड भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. परिणामी, शहराला वाहतुकीच्या प्रचंड कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील आसपासच्या सुमारे २६ हून अधिक गावांतील बहुतांश नागरिकांचा राबता हा कोल्हापूर शहरात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताणही पडत आहे. शहरात प्रवेश करणारा मार्ग हा शिवाजी पुलावरून येतो. अरुंद पुलावरून एकाचवेळी मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गावरून प्रवेश करणे म्हणजे जीवावर संकट ओढविण्याचा प्रकार होय.
शहरात प्रवेशणाºया प्रमुख १२ मार्गांपैकी कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रमुख राज्य महामार्ग होय. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला गोवा, कोकण व पूर्वेकडे कर्नाटक राज्याकडे जाणाºया सर्व अवजड वाहनांची वाहतूक कोल्हापूर शहरातूनच होते. याशिवाय रोज किमान २६ ते २८ हजार वेगवेगळ्या वाहनांची ये-जा शिवाजी पूल मार्गे कोल्हापूर शहरातून होते. पन्हाळा ते कोल्हापूर या मार्गाच्या परिसरातील सुमारे २५ हून अधिक गावांतील नागरिकांचा नोकरीसह विविध निमित्ताने कोल्हापूर शहरात रोजचा राबता आहे. त्यामुळे त्यांचा दैनंदिन भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. मलकापूर ते कोल्हापूरपर्यंतचा मार्ग अवघा १५ फूट रुंदीचा अरुंद असल्याने त्यामानाने त्यावर वाहतुकीचा भार अधिक असल्याने रस्ता रुंदीकरण होणे काळाची गरज बनली आहे.
या मार्गावरील वाहतूक कोल्हापुरात प्रवेश केल्यानंतर तिचा परिणाम शहरातील वाहतुकीवर पावलोपावली वाहतुकीच्या कोंडीने दिसून येतो. शिवाजी पूल मार्गे शहरात वाहनांनी प्रवेश केल्यानंतर तोरस्कर चौक, शनिवार पेठ चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, तसेच गंगावेश चौकात त्याचा प्रमुख परिणाम दिसून येतो. अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे लोंढे यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.
स्टेशन रोडवर अतिरिक्त भार
कोकणची वाहतूक शहरात आल्यानंतर ताण पडणारे तोरस्कर चौक, गंगावेश चौक, सीपीआर चौक व दसरा चौक हे मोठे करून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. दसरा चौकात वाहने आल्यानंतर ती कसबा बावडामार्गे राष्टÑीय महामार्गाकडे वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील स्टेशन रोडवरील भारही कमी होण्यास मदत होईल. चौकाचौकांत दिशादर्शक फलकही लावल्यास वाहतूक रेंगाळून वाहतुकीची कोंडी होणार नाही.
रस्ता चौपदरी हवा
रत्नागिरीहून येणारा मार्ग कोल्हापूर शहरापर्यंत, शिवाजी पूल ते तावडे हॉटेलपर्यंत (राष्टÑीय महामार्गापर्यंत) शहरांतर्गत मार्ग अत्यंत अरुंद असल्याने त्याचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्याची अवघी १५ फूट रुंदी व त्यावरील वाहतुकीची गर्दी पाहता हा रस्ता चौपदरीकरण केल्यास वाहतूक कोंडीचा काहीअंशी प्रश्न मार्गी लागेल. शहरातील या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण होणे गरजेचे आहे.