नृसिंहवाडीकरांचं सारं काही हिरावलं -: महापुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:16 AM2019-08-23T00:16:44+5:302019-08-23T00:17:41+5:30
आॅन दी स्पॉट नृसिंहवाडी --महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक मार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती.
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत श्री दत्ताचं देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं क्षेत्र. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेल्या या तीर्थक्षेत्राला महापुराचा नेहमीच फटका बसतो. मात्र, यंदाच्या महापुराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. यावर्षी वाडी तब्बल १५ दिवस पाण्याखाली राहिली. त्यात कोट्यवधींचे नुकसान केले. महापुराने अनेकांचा संसार वाहून नेला, शिवाय गावाची अवस्था दयनीय करून टाकली. स्थलांतर झालेले नागरिक परतताच त्यांची अवस्था भेदरल्यासारखी झाली होती. कारण यंदाच्या महापुराने सारंच हिरावलं आहे.
यापूर्वी २००५ मध्ये आलेल्या महापुराने चांगलेच थैमान घातले होते. यातून नृसिंहवाडीकर थोडे थोडे सावरू लागले. २०१६ मध्ये आलेल्या कन्यागत महापर्वकाल सोहळ्यामुळे येथील व्यापारी तसेच ग्रामस्थांनी कंबर कसली आणि भाविकांच्या सोयीसाठी चांगल्या प्रकारची दुकाने थाटली. तसेच दत्तभक्त व भाविकांसाठी सोयीसुविधाही केल्या. सर्वकाही स्थिरस्थावर होत असतानाच यावर्षी आॅगस्ट महिन्यात आलेला महापूर नृसिंहवाडीसाठी मोठा धक्कादायक ठरला. सारं काही सजलेलं, नटलेलं नृसिंहवाडीसाठी नवी ओळख करून देणारं साम्राज्य महापुरात लयाला गेलं.
मेवा मिठाईबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, खेळणी, पूजा साहित्य याची सुमारे दीडशे ते दोनशे दुकानं महापुरात पार कोलमडली आणि उरला नुसता चिखलगाळ. तयार केलेले आकर्षक लाकडी फर्निचर, पीओपीसह श्रावण पौर्णिमेनिमित्त तयार केलेलं मालमटेरियल नाहीसं झालं. संसारोपयोगी वस्तू तसेच टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा महागड्या वस्तू वाहून गेल्या, तर काही पाणी जाऊन खराब झाल्या. अनेक घरांची पडझड झाली. काहींची घरं छपरासकट बुडाली, तर अनेक ग्रामस्थांचे अतोनात हाल आणि नुकसान झाले.
महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक
मार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती. ‘मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा’ या कुसुमाग्रजांच्या कवितेनुसार येथील ग्रामस्थांनी झालेल्या नुकसानीने दु:ख करत न बसता कंबर कसली आणि सावरण्यास सुरुवात केली.
येथील दत्त देव संस्थान, ग्रामपंचायत नृसिंहवाडी, विविध सेवाभावी संस्था, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका रक्षक ग्रुप, स्वयंसेवक संघ, व्हाईट आर्मीअशा अनेक मुंबई-पुणे आदी ठिकाणांहूनसुद्धा लोक देवदूतसारखे मदतीला धावले.
सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने नृसिंहवाडी पुन्हा उभारत आहे. यावर्षी तब्बल २० दिवस बाहेरच्या भाविकांना श्रीचरणाची लागलेली आस गुरुवारी पूर्ण झाली. आता पुन्हा नृसिंहवाडी गजबजू लागली आहे.
लवकरच गतवैभव प्राप्त होईल
महापुरानंतर सावरताना ग्रामपंचायत, पुजारी मंडळी, सेवेकरी मंडळी, ग्रामस्थ तसेच सेवाभावी संस्था यांच्या अथक प्रयत्नातून मंदिर व परिसरातील स्वच्छता पूर्ण झाली असून, मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. एवढ्या महापुरातसुद्धा दत्त महाराजांची त्रिकाळ पूजाअर्चा सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाली. देवस्थानमार्फत महाप्रसाद कायमच चालू ठेवला. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने वाडीला लवकरच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास श्री दत्त देव संस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण पुजारी व सचिव अमोल विभूते यांनी व्यक्त केला.
मुंबई मनपाकडून स्वच्छता
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व आयुक्त यांनी सुमारे १५० स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज दत्त तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेसाठी पाठवली होती. या कार्यासाठी मुंबईचे सहायक कमिशनर या स्वच्छता कार्याच्या देखरेखीसाठी हजर होते. गेल्या तीन दिवसांपासून सलग मुंबई महापालिकेच्या या स्वच्छतादूतांनी आपले काम अव्याहतपणे सुरू ठेवले होते. महापालिकेने त्यांना आरोग्याच्या दृष्टीने केमिकल, पावडर, मुंबईच्या धरतीवर लागणारे सर्व स्वच्छतेचे साहित्य यांसह पाठविले आणि त्यांनी दत्त महाराजांची सेवा म्हणून स्वच्छतेचे काम अव्याहतपणे पार पाडले.