सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय स्पर्धांचा ‘डबलबार’
By admin | Published: April 15, 2015 11:41 PM2015-04-15T23:41:49+5:302015-04-16T00:00:59+5:30
एप्रिल महिन्यात फिव्हर : लॉन टेनिस, खो-खो स्पर्धा
सांगली : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सांगलीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा डबलबार उडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील नामांकित खेळाडूंचे दर्शन या स्पर्धेतून सांगलीकरांना होणार आहे.
२२ ते २५ एप्रिलदरम्यान १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहेत. संकुलात नव्याने बांधण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन या स्पर्धेने होणार आहे. क्रीडाधिकारी कार्यालयाने ८० लाख रुपये खर्च करून संकुलात सहा लॉन टेनिसची मैदाने बांधली आहेत. यापैकी दोन खुल्या गटासाठी व चार शालेय खेळाडूंसाठी आहेत. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरीही बांधण्यात आली आहे. यापूर्वी २००६ मध्ये सांगलीत राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा झाली होती. लॉन टेनिस स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक आणि त्यांच्या पथकाची धावपळ सुरू आहे.
२१ ते २५ एप्रिल दरम्यान कुपवाडमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होणार आहेत. शिवप्रेमी मंडळाच्या मैदानावर किशोर-किशोरी व पुरुष-महिला अशा दोन गटांत या स्पर्धा होतील. खो-खोपटूंचे गाव म्हणून कुपवाडची ओळख आहे. यापूर्वी कुपवाडमध्ये एक राज्यस्तरीय व एक महापौर चषक खो-खो स्पर्धा झाली आहे. शिवप्रेमी मंडळ स्पर्धेचे मुख्य संयोजक आहेत. ‘आपलं खो-खो लय भारी’ अशी या स्पर्धेची कॅचलाईन तयार करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी एकूण पाच मैदाने तयार करण्याचे काम सुरू आहे.
राष्ट्रीय स्पर्धांचा तडाका
२२ ते २५ एप्रिलदरम्यान राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा
२१ ते २५ एप्रिलदरम्यान राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
देशभरातील नामांकित खेळाडूंची उपस्थिती
ऐंशी लाखांच्या लॉन टेनिस मैदानाचे उद्घाटन