राष्ट्रीय कॉँग्रेस-‘शविआ’त दुरंगी शक्य
By Admin | Published: October 7, 2016 11:09 PM2016-10-07T23:09:23+5:302016-10-07T23:49:55+5:30
इचलकरंजी नगराध्यक्ष निवडणूक : मराठा मोर्चा, डॉ. आंबेडकर, शिवजयंतीचा परिणाम; पक्ष, आघाड्यांकडून सावध पवित्रा
राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी
मराठा क्रांती मोर्चा, शहरात साजरी करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, अशा घटनांचा परिणाम नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांवर पडणार असल्याने नगराध्यक्षपदी उमेदवार उभ्या करणाऱ्या पक्ष व आघाड्यांकडून सावध पवित्रा स्वीकारला जात आहे. नगराध्यक्षपद मागासवर्गीयांसाठी आरक्षित असल्याने राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजपप्रणीत शहर विकास आघाडी यांच्या उमेदवारांतच लढत होण्याची चिन्हे आहेत.
जनतेतून नगराध्यक्ष अशी निवडणूक प्रक्रिया यापूर्वी सन १९७६ व २००१ मध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी अनुक्रमे पंडितकाका कुलकर्णी व किशोरी आवाडे असे नगराध्यक्ष निवडले गेले होते. कुलकर्णी हे तत्कालीन नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले असले तरी त्यावेळी त्यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांना त्यावेळी पालिकेचे फारसे कामकाज करता आले नाही. त्यानंतर कॉँग्रेसच्या आवाडे नगराध्यक्षा झाल्या. मात्र, तेव्हाही कॉँग्रेसला बहुमत मिळाले नाही; पण कॉँग्रेसने विरोधी नगरसेवक फोडून घेऊन बहुमत करून घऊन पाच वर्षे कारभार केला.
यापूर्वी कॉँग्रेसचे आघाडी शासन असताना नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाले होते. त्यानंतर सध्याच्या भाजप-सेना युती सरकारने नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलली. जनतेतून नगराध्यक्ष ही प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे ठरले. म्हणून नगराध्यक्षपदासाठी पुन्हा सोडती काढण्यात आल्या. इचलकरंजीसाठी पुन्हा मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षण पडले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडीची आरक्षणे जाहीर होताच पक्ष व आघाड्यांच्या स्तरावर तयारीला पुन्हा वेग आला आहे. पक्ष व आघाड्यांनी नगरपालिकेमध्ये अधिक नगरसेवक निवडून येऊन बहुमत व्हावे, यासाठी प्रभाग स्तरावर ‘इलेक्शन मेरिट’ असलेले उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणेच नगराध्यक्षपदासाठी सुद्धा खात्रीने निवडून यावा, अशा उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. शहरातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजपप्रणीत शहर विकास आघाडी यांच्यातच नगराध्यक्षपदासाठी लढत होईल.
सहा महिन्यांतील घडामोडींबद्दल नेत्यांमध्ये चिंता
इचलकरंजीतील नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय आरक्षित असले तरी ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला बहुजनांची मते आवश्यक आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून डॉ. आंबेडकर जयंती, शिवजयंती व मराठा क्रांती मोर्चा यांचे परिणाम समाजावर दिसून येत आहेत. या घटनांमधून शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये झालेल्या घडामोडींचे चित्र नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रतिबिंबित होणार आहे. त्यामुळे विशेषत: मराठा क्रांती मोर्चाच्या परिणामांबद्दल राजकीय व पक्ष आघाड्यांच्या नेतेमंडळींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कॉँग्रेसने इच्छुकांकडून मागितले उमेदवारी अर्ज
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रीय कॉँग्रेसच्या येथील शहर कार्यालयात उमेदवारीचे मागणी अर्ज द्यावेत. मागणी अर्ज देण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. उमेदवारीच्या मागणी अर्जाचे विविध नमुने शहर कॉँग्रेस समितीतून घ्यावेत, असेही या पत्रकात नमूद केले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षासाठी उमेदवारच नाही
भाजपच्यावतीने अलका स्वामी या नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. कॉँग्रेसकडून रवी रजपुते, राजा कांबळे आणि संजय आवळे यांची नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीमध्ये जांभळे गट राष्ट्रीय कॉँग्रेसबरोबर आघाडी करेल. कारंडे गट शहर विकास आघाडी बरोबर समन्वय साधणार आहेत.
मॅँचेस्टर आघाडीनेसुद्धा फक्त नगरसेवकपदाच्या जागा लढविण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये असलेल्या दोन गटांपैकी जांभळे गट राष्ट्रीय कॉँग्रेसबरोबर आघाडी करणार आहे. तर कारंडे गट शहर विकास आघाडीबरोबर समन्वय साधणार आहे.
तसेच मॅँचेस्टर आघाडीकडून सुद्धा फक्त नगरसेवकपदाच्या जागा लढविल्या जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.