कोल्हापूरात राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकांची फसवणूक न होण्याची दक्षता घ्या : सविता भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:42 PM2018-12-24T16:42:36+5:302018-12-24T16:43:32+5:30
ग्राहकांची कसल्याही प्रकारे फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांनी सोमवारी येथे केले.
कोल्हापूर : ग्राहकांची कसल्याही प्रकारे फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांनी सोमवारी येथे केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे भवानी मंडप येथे आयोजित केलेल्या ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनाचे उदघाटनप्रसंगीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी. आर. माळी, महाराष्ट्र राज्य ग्राहक समिती सदस्य अरुण यादव, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे- जाधव, महसुल नायब तहसिलदार अश्विनी वरुटे, कोल्हापूर शहर रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.
सविता भोसले म्हणाल्या, जनतेनं विशेषत: सर्वच ग्राहकांनी सदैव जागृत राहून, ग्राहकांच्या हक्क आणि कर्तव्यांची जोपासनेस प्राधान्य द्यावे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहकाच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्य करत असून ग्राहकांनी आपली फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागावी.
अरुण यादव म्हणाले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकास स्वत:ची तक्रार स्वत: दाखल करता येते. ग्राहकांनी आपल्या न्याय हक्कासाठी स्वत: पुढे यायला हवे. ग्राहक न्याय मंचाबरोबरच ग्राहक पंचायती तालुकास्तरावरील संघटनेमार्फतही ग्राहकांनी आपले प्रश्न सोडवावेत. माधवी शिंदे- जाधव यांनी स्वागत केले. यावेळी सर्व रेशन दुकानदार, पुरवठा निरिक्षक व नागरिक उपस्थित होते.
स्टॉलमधून ग्राहकांचे प्रबोधन
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित केलेल्या अन्न, औषध व प्रशासन, भारत गॅस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, भारत संचार निगम लिमिटेड, वैधमापन शास्त्र, आरोग्य विभाग, कृषिविभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, डाकघर अशा विविध विभागांनी स्टॉल लावून ग्राहकांना प्रात्याक्षिके तसेच माहिती पत्रकाव्दारे प्रबोधन केले.