नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:56+5:302021-07-29T04:25:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय ...

National Highway is the father of Mahapura | नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप

नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

बुधवारी (दि. २८) खासदार मंडलिक यांनी गडहिंग्लज शहरासह अरळगुंडी, कडलगे, नांगनूर, हिटणी, निलजी, हेब्बाळ, दुंडगे, जरळी, इंचनाळ व ऐनापूर येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी गडहिंग्लज नगरपालिकेत पत्रकारांशी संवाद साधला. घरांच्या आणि पिकांच्या नुकसानभरपाईत एकही माणूस शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

मंडलिक म्हणाले, सातारा ते कागलपर्यंतच्या सहापदरी महामार्ग रूंदीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांसमवेत आपण संबंधित गावांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनांमधूनही राष्ट्रीय महामार्ग हेच महापुराचे प्रमुख कारण असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महामार्ग रूंदीकरणाच्यावेळी त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

राष्ट्रीय महामार्गाबरोबरच पूररेषेतील अनधिकृत बांधकामांमुळेच कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पूरबाधित क्षेत्रात बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी घ्यायला हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चौकट : हा संशोधनाचा भाग..!

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ७०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु, ही मदत २०१९च्या पुराची की यावर्षीच्या पुराची आहे हा संशोधनाचा भाग आहे, अशी टिप्पणीही खासदार मंडलिक यांनी यावेळी केली.

चौकट : अधिकाऱ्यांचे अभिनंदन..!

महापुराच्या काळात पूरबाधित गावांना प्रत्यक्ष भेट देऊन लोकांचे मनोबल उंचावण्याचे काम गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असेही मंडलिक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

फोटो ओळी : महापुरात घर जमीनदोस्त झालेल्या गडहिंग्लज शहरातील शिवूबाई रिंगणे या वयोवृद्ध महिलेची व्यथा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी जाणून घेतली. यावेळी आमदार राजेश पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, सोमगोंडा आरबोळे, गुंड्या पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : २८०८२०२१-गड-०५

Web Title: National Highway is the father of Mahapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.