कोल्हापुरातील कलाशिक्षक सागर बगाडे यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:58 AM2024-08-28T11:58:59+5:302024-08-28T11:59:21+5:30
कोल्हापूर : येथील चित्रकार, रंगकर्मी, नृत्यकर्मी व स. म. लोहिया हायस्कूलमधील कला शिक्षक सागर चित्तरंजन बगाडे (रा. पाचगाव, ता. ...
कोल्हापूर : येथील चित्रकार, रंगकर्मी, नृत्यकर्मी व स. म. लोहिया हायस्कूलमधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे (रा. पाचगाव, ता. करवीर) यांना मंगळवारी ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला. ५ सप्टेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.
पंढरपूर येथील प्रार्थना समाजाकडून चालवण्यात येणारे वा. बा. नवरंगे बालकाश्रमात अनाथ म्हणून जगण्याची सुरुवात केलेल्या सागर यांना जीवनाच्या सुरुवातीला अनेक संघर्षाला सामाेरे जावे लागले; परंतु त्यांनी हिमतीने जीवन घडवले व बाल कल्याण संकुलातील अनेक मुलांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी ते सतत धडपड करत राहिले. पंढरपूरच्या बालकाश्रमातील मुलांसाठी त्यांनी अनेक वर्षे ‘मामाचा गाव’ हा उपक्रम राबवून त्यांच्या गुणांना संधी दिली. आपण ज्या संस्थेतून घडलो, त्या संस्थेतील राज्यभरातील मुलांसाठी काहीही करायचे झाल्यास बगाडे सगळ्यात पुढे राहिले आहेत.
बगाडे हे गेली २४ वर्षे स. म. लोहिया हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते स्वत: उत्तम चित्रकार, रंगकर्मी व नृत्य दिग्दर्शक आहेत. सार्थक क्रिएशन या नृत्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक गाजवला आहे. यासह ते कोल्हापुरातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनाथ व निराधार बालके, सेक्सवर्कर अशा वंचित घटकांसाठी काम केले आहे. महापुरात नागरिकांच्या बचावकार्यात ते सहभागी होते.
या पुरस्कारासाठी जुलै महिन्यात राष्ट्रीय पातळीवरून प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्हा, राज्य व केंद्रस्तरावरील मुलाखती, छाननीनंतर अंतिम फेरीसाठी राज्यातील ६ शिक्षकांची निवड झाली होती. त्यामधून कोल्हापुरातील सागर बगाडे व गडचिरोली येथील मंतैय्या बेडके यांना पुरस्कार जाहीर झाला.