कोल्हापुरात उभारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 08:09 PM2019-06-06T20:09:30+5:302019-06-06T20:13:32+5:30

देशातील अशा अव्वल संशोधन केंद्राच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा यासाठी येथील शंभर एकर परिसरात नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येईल. ४ ते १० आॅक्टोबर दरम्यान येथून पहिले रॉकेट सोडले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

The National Student Rocket Launching Center will be set up at Kolhapur | कोल्हापुरात उभारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर

कोल्हापुरातील निर्माण चौकात गुरुवारी एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅबच्या उद्घाटनप्रसंगी रॉकेट, विमान आणि ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात उभारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटरचंद्रकांत पाटील यांच्याहस्ते एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन

कोल्हापूर : भारतातील तरुणांमध्ये खूप बुद्धिमत्ता आहे. पण, भारताने जगभरातील संशोधन साहित्याचे उत्पादक न होता येथे नव संशोधक तयार व्हावेत व त्यांचे संशोधन जगाला उपयोगी ठरले पाहिजे. त्यासाठी काम करणाऱ्या देशातील अशा अव्वल संशोधन केंद्राच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा यासाठी येथील शंभर एकर परिसरात नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येईल. ४ ते १० आॅक्टोबर दरम्यान येथून पहिले रॉकेट सोडले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

येथील निर्माण चौकात भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉ. शिवराम भोजे, अंजली पाटील, कोल्हापूर पोलीस क्षेत्राचे महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी खासदार धनंजय महाडिक, भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, ‘इस्रो’चे माजी प्रकल्प संचालक टी. के. सुंदरमूर्ती, एसडीएनएक्सचे संस्थापक संजय राठी, डीआरडीओचे माजी संशोधक वराप्रसाद मुरली, नासा हनीवेल्सचे स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी या क्षेत्रातील संशोधक लूक नाथन हायस, गोविंद यादव, मिलाप मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री पाटील म्हणाले, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात देशाची झपाट्याने प्रगती होत असून, यामध्ये अनेक तरुण चमकत आहेत. भारतात नव संशोधक तयार होण्यासाठी लहानपणापासूनच मुलांमध्ये संशोधनाची वृत्ती तयार केली पाहिजे. यादृष्टीने एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब अत्यंत महत्त्वाची ठरेल.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना ३६ तासांचा अभ्यासक्रम असून, रोबोटिक आर, सॅटेलाईट, रॉकेट, आदी विविध अवकाशीय उपकरणे घडामोडींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येईल, प्रात्यक्षिके दाखविली जातील. यावेळी त्यांनी विद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये आवश्यक साहित्य व सुविधा देण्यात येतील. तसेच फिरत्या प्रयोगशाळांसारखे उपक्रमही राबविण्यात येतील, असे सांगितले.

शिवराम भोजे म्हणाले, अंतराळ संशोधनात भारताने केलेली कामगिरी अद्वितीय असून, भारतामध्ये प्रचंड बौद्धिक, तांत्रिक क्षमता आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करून त्याचा देशाच्या विकासासाठी उपयोग होणे महत्त्वाचे आहे.

ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, या लॅबमध्ये पहिल्या टप्प्यात सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन वयोगटांतील प्रत्येकी शंभर मुलांसाठी १० ते १५ जून या कालावधीमध्ये प्रवेश अर्ज उपलब्ध असतील. या कार्यशाळेमध्ये रोबोटिक आर्म, ड्रोन, रॉकेट, सॅटेलाईट असे वेगवेगळे बारा प्रकल्प शिकविले जाणार आहेत.
यावेळी उपस्थित संशोधकांनी मनोगत व्यक्त करून कोल्हापूरचे नाव संशोधन क्षेत्रात पुढे यावे, अशी इच्छा व्यक्त केली. लूक नाथन हायस यांनी सर्वांशी मराठीत संवाद साधताच त्यांना कोल्हापूरकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

 

 

Web Title: The National Student Rocket Launching Center will be set up at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.