राष्ट्रवादीकडून पुन्हा मुन्ना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:53 AM2018-04-24T00:53:48+5:302018-04-24T00:53:48+5:30
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच रविवारी रात्री पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासाठी चक्क तासभर ‘वेटिंग’ करण्याची पाळी आली. मुश्रीफ आल्यानंतरच खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी मुश्रीफ व महाडिक यांच्या मनोमिलनाचे स्नेहभोजन झाले. त्यामुळे कितीही तक्रारी असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा गाडा मुश्रीफ यांच्याशिवाय हालू शकत नसल्याचे ठळक झाले.
धनंजय महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीतील विजयही मुश्रीफ यांच्याशिवाय सोपा नसल्याचे माहीत असल्यामुळेच पवार यांनीही त्यांना एवढे महत्त्व दिल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एका निवडणुकीत ‘कौन यह है मुन्ना..,’ अशी विचारणा शरद पवार यांनीच केली होती. आता पुन्हा त्याच महाडिक यांच्याशिवाय राष्ट्रवादीपुढे दुसरा पर्याय नसल्याचेही दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या मेळाव्यावेळी मुश्रीफ यांनी जाहीरपणे मी महाडिक यांच्या घरी जेवायला जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाडिकही कमालीचे नाराज झाले. हे लक्षात आल्यावर पवार यांनी मुश्रीफ यांना जेवायला यावे, असा आदेशच दिला होता. मुश्रीफ पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे महाडिक यांच्या घरी पोहोचायला त्यांना ८.३० वाजून गेले होते. ते आल्यानंतर जुन्या राजकीय आठवणी, साखर उद्योगाची सद्य:स्थिती या विषयांवर थोडी चर्चा झाल्यानंतर सगळेच जेवायला उठले. जेवण झाल्यावरही ज्याच्यासाठी बोलावले होते त्या मुश्रीफ-महाडिक वादाबद्दल थेट कोणतीच चर्चा झाली नाही. जेवण झाल्यानंतर ९.३० च्या सुमारास सर्वजण तेथून निघून गेले. महाडिक यांच्या घरी जेवायला बोलावून तुम्हाला त्यांनाच सोबत घेऊन पुढे जायचे आहे, असा ‘मेसेज’च मुश्रीफ यांना पवार यांनी दिल्याचे मानण्यात येते.
गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांनीच महाडिक यांना पायघड्या घालून पक्षात घेतले व लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी व निवडणुकीतील विजयासाठीही ताकद पणाला लावली; परंतु एकदा गुलाल पडल्यानंतर महाडिक यांची मात्र भूमिका बदलली. विधानसभा, विधान परिषद, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका पक्षाच्या विरोधात राहिली. किंबहुना ते या कोणत्याच निवडणुकीत पक्षासोबत नव्हते. त्यांची पावले भाजपच्या दिशेने पडू लागली होती. त्यामुळे मुश्रीफ यांनीच अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नसलेल्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना विजयी करणार असल्याचे जाहीर केले. राज्यात व देशाच्या राजकारणातही भाजपबद्दल चांगले जनमत आजही असते, तर महाडिक हे भाजपचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरले असते; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. देशभर भाजपच्या विरोधात वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे महाडिक यांचीही भूमिका बदलली असून, ते ‘राष्ट्रवादी पुन्हा..’ असा सूर आवळू लागले आहेत. जिल्ह्यातील पक्ष महाडिक यांच्यासोबत नसला तरी शरद पवार यांच्याशी मात्र त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. देशपातळीवर आता पवार यांनाही नव्याने कमालीचे राजकीय महत्त्व आले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्यादृष्टीनेही एकेक जागा महत्त्वाची आहे. महाडिक यांनी पक्षविरोधी काम केले असले तरी आजच्या घडीला त्यांना सक्षम पर्याय देऊ शकेल, असा उमेदवार पक्षाकडे नाही. भाजप-शिवसेनेची युती होणार असेल, तर संजय मंडलिक शिवसेनेला सोडायला तयार नाहीत. महाडिक यांना बाजूला केले, तर मुश्रीफ यांनाच रिंगणात उतरावे लागेल; परंतु त्यालाही त्यांची तयारी नाही. कारण त्यांना भविष्यात राज्याच्या राजकारणात महत्त्वाची संधी मिळू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, महाडिक यांनी लोकसभेत काम करणारा लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा निर्माण केली आहे. शिवाय महाडिक उमेदवार असतील तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचेही उपद्रव मूल्य काही नसेल. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत; परंतु दुसऱ्या बाजूला मुश्रीफ यांनाही डावलून खासदार महाडिक यांना निवडून आणणे शक्य नाही, हे देखील पवार जाणून आहेत. सध्याची वाटचाल त्या दिशेनेच सुरू असल्याचे चित्र पवार यांच्या दौºयानंतर ठळक झाले.
माझी ‘व्हेटो पॉवर’ सर्वांना मान्य...
पत्रकार परिषदेतही राष्ट्रवादीतील गटबाजीबद्दल पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर अशी गटबाजी असल्याचे मान्य करून पवार म्हणाले, ‘हा विषय आम्ही घरात एकत्र बसून सोडवू. तो वृत्तपत्रांत चर्चा करण्याचा नाही, असे प्रश्न ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत, त्यातील ६० ते ७० टक्के प्रश्न राज्य पातळीवरील नेत्यांनी चर्चा करून सोडविले जातात. राहिलेल्या ३० टक्के प्रश्नांमध्ये निर्णय घेण्याची ‘व्हेटो पॉवर’ मला दिली जाते. मी जेव्हा एखादा निर्णय देतो, तेव्हा तो सर्व नेते स्वीकारतात. त्यावर पुन्हा कोणतीच चर्चा होत नाही.’
मनोमिलनाचे प्रयत्न
मुश्रीफ व धनंजय महाडिक या दोन नेत्यांच्या गटबाजीमध्ये पक्षाचे नुकसान होऊ शकते हे माहीत असल्यामुळेच पवार यांनी त्यांच्यात मनोमिलनासाठी एकत्र स्नेहभोजन घडवून आणले. पवार यांनीच जर महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली, तर मुश्रीफ यांना पक्षाचा उमेदवार म्हणून त्या निर्णयानुसार काम करणे भाग पडेल.