नेवाळीचा प्रश्न राष्ट्रवादी विधिमंडळात मांडणार

By Admin | Published: July 10, 2017 04:04 AM2017-07-10T04:04:01+5:302017-07-10T04:04:01+5:30

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे

Nationalist Congress Party | नेवाळीचा प्रश्न राष्ट्रवादी विधिमंडळात मांडणार

नेवाळीचा प्रश्न राष्ट्रवादी विधिमंडळात मांडणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात आहे. त्यावर तोडग्यासाठी राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि जमीन परत करण्याच्या मागणीवर राष्ट्रवादी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवेल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडल्यानंतर तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेवाळी पाडा, भाल आणि वसार या गावांना भेट दिली. पीडित शेतकऱ्यांसह महिलांची भेट घेतली. तेव्हा पवार यांच्यापेक्षा तटकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, गावातील संघर्ष समितीचे नेते गुलाब वझे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीने उपचार उरकल्याची भावना
नेवाळी पाडा, वसार, भाल गावात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली. खोणी गावात नेते जाणार होते. पण पवार यांची गाडी पुढे निघून गेल्याने ही भेट रद्द झाली. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवादही न साधल्याने या भेटीचा फक्त उपचार उरकला गेला. काहीही साध्य झाले नसल्याची भावना नेवाळी आंदोलन पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे आंदोलन २२ जूनला झाले आणि दुसऱ्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आले, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना २० दिवसांनी आंदोलनकर्त्यांची आठवण झाली. स्थानिक नेत्यांनीही या काळत दुर्लक्ष केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पाठ फिरवल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
‘आमच्या माणसांना बाहेर काढा’
नेवाळी आंदोलनात अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. कर्ते पुरुष लॉकअपमध्ये आहेत. त्यांना मारहाण होते. फक्त महिला व मुलांना शेतीची कामे करता येत नाही. मुले शाळेत जात नाहीत. नेवाळी नाक्यावर भाजी घेण्यासाठीही कोणी गेले, तर त्याला पोलिस उचलून नेतात. पोलिसांची दहशत आहे. यावर काही तोडगा काढा, अशी मागणी गावातील महिलांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे केली. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेऊनही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
>आंदोलकांतही दुजाभाव
नेवाळी आंदोलनप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तीन व मानपाडा पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. ६७ जणांविरोधात कलमे सारखीच लावली होती. मानपाडा पोलीस ठाण्यातील २५ जणांना न्यायालयाने जामीन दिला. मात्र हिललाईन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांप्रकरणी अद्याप जामीन न मिळाल्याने आंदोलकांत दुजाभाव केल्याची कूरबूर नेवाळी परिसरातील ग्रामस्थांनी केली.

Web Title: Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.