राष्ट्रवादीच्या प्रयत्नाला काँग्रेसचा ‘नो रिस्पॉन्स’
By admin | Published: September 17, 2014 12:44 AM2014-09-17T00:44:19+5:302014-09-17T00:51:13+5:30
जिल्हा परिषदेतील राजकारण : ‘काँग्रेस-स्वाभिमानी’ आघाडी कायम
राजाराम लोंढे -कोल्हापूर -जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही काँग्रेसने एकत्रित सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत; पण त्याला काँग्रेस नेत्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरची पाच वर्षांची आघाडी कायम ठेवावी, असा काँग्रेसमधील काही नेत्यांचा आग्रह असल्याने राष्ट्रवादीमधील इच्छुकांचे सत्तेचे मनसुबे साकार होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.
अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शाहूवाडी विकास आघाडीला बरोबर घेत सत्ता स्थापन केली होती. आता नवीन आरक्षणानुसार पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होत आहे. मागील पंचवार्षिकमध्ये शेवटच्या अडीच वर्षांसाठी वापरलेला ‘फॉर्म्युला’ कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य प्रयत्नशील आहेत तसा प्रयत्नही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सुरू झाला आहे; पण काँग्रेसचे नेते त्याचा सकारात्मक विचार करतील याची शक्यता फारच कमी आहे. राष्ट्रवादीला गरज नसताना सत्तेत घेऊन पदांमध्ये वाटेकरी करण्याची मानसिकता काँग्रेस नेत्यांची नाही. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींकडे फारसे कोणी लक्ष देतील, अशी परिस्थिती नाही.
अध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिले’साठी राखीव आहे. या पदासाठी ज्योती पाटील, विमल पाटील व प्रिया वरेकर यांची नावे चर्चेत आहेत पण ज्योती पाटील यांचे नाव मागे पडत असून, विमल पाटील की प्रिया वरेकर हीच नावे पुढे आली आहेत. गेल्यावेळेला गृहराज्यमंत्री पाटील यांनी आपला अध्यक्ष केल्याने यावेळी पी. एन. पाटील सांगतील तोच अध्यक्ष होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विमल पाटील यांना अध्यक्षपदाची संधी अधिक आहे.
विमल पाटील या पी. एन. पाटील यांच्या, तर वरेकर या गृहराज्यमंत्री सतेज पाटील समर्थक आहेत. वरेकर या गृहराज्यमंत्री पाटील यांच्या समर्थक असल्या तरी त्या पी. एन. पाटील यांच्या गगनबावडा तालुक्यातील असल्याने वरेकर यांचे नावे पुढे करीत सतेज पाटील एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची शक्यता आहे; पण पाटील किंवा वरेकर यांच्यापैकी कोणाची जरी वर्णी लागली तरी लाल दिवा करवीर मतदारसंघातच येण्याची शक्यता अधिक आहे.
आपटेंना उपाध्यक्षपद
विद्यमान अध्यक्ष उमेश आपटे यांनी अल्पावधीत आपल्या कामांचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत, ते तडीस नेण्यासाठी उपाध्यक्षपद देऊन आपटेंनाच पुढे चाल मिळण्याची दाट शक्यता आहे.
असे होऊ शकते पदांचे वाटप
अध्यक्षपद - पी. एन. पाटील समर्थक
उपाध्यक्षपद - सतेज पाटील समर्थक
बांधकाम- ‘स्वाभिमानी’कडे कायम
समाजकल्याण- सा. रे. पाटील समर्थक
शिक्षण - सतेज पाटील समर्थक
महिला-बालकल्याण- जयवंतराव आवळे समर्थक