राष्ट्रवादी म्हणजे लाचखोरांची टोळी
By admin | Published: October 29, 2015 12:34 AM2015-10-29T00:34:46+5:302015-10-29T00:47:39+5:30
गोपीचंद पडळकर यांची टीका : पूजा नाईकनवरे यांची कोपरा सभा
कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी लाचखोरांची टोळी असल्याची टीका भाजप प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी केली. शाहूपुरी तालीम येथील भाजप-ताराराणी महायुतीच्या उमेदवार पूजा नाईकनवरे यांच्या कोपरा सभेत ते बोलत होते.
पडळकर म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष महापालिकेत सत्तेत आहे; परंतु त्यांनी शहराचे वाटोळे केले आहे. या पक्षाचे नेते कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचा वल्गना करतात. खरेच तेवढा निधी आला असेल तर तो कुठे मुरला याचा शोध आवश्यक आहे. विकासकार्य खालील थरापर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचार झिरपल्याचे दिसून येते. राज्यात त्यांच्या नेत्यांचे रोज नवे कारनामे वाचायला मिळतात. मध्यवर्ती बॅँकेला लुटण्याचेच काम झाले. सहकारमंत्र्यांनी चौकशी लावून, जबाबदारी निश्चित करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दणका दिला आहे. कोल्हापूरच्या विकासकामांची सबब पुढे करून केवळ ढपला पाडण्याचेच काम झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते. अशा भ्रष्ट प्रवृत्तीकडून विकासकार्य होणे शक्य नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीला हद्दपार करा.
उमेदवार पूजा नाईकनवरे यांनी जनसेवेसाठी सर्वांनीच आशीर्वाद द्या, असे आवाहन केले. सभेला व्हीनस कॉर्नरचे उमेदवार प्रकाश नाईकनवरे, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, आनंदराव सांगवडेकर, रावणमामा, अनिल पाटील, नितीन चिपळूणकर, जहॉँगीर मालदार, अतुल मिरजकर, विजय अकोळकर, प्रकाश बापू कुपटे, आदींसह नागरिक उपस्थित होते.