वाळू माफियांमागे राष्ट्रवादी नेत्यांचा हात
By admin | Published: November 23, 2014 11:09 PM2014-11-23T23:09:45+5:302014-11-23T23:56:33+5:30
संजय पाटील : अधिकारी, पोलिसांवर कारवाईची मागणी करणार
सांगली : राजापूर येथे वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्याची घटना दुर्दैवी असून, राष्ट्रवादी नेत्यांच्या पाठबळामुळेच माफियाराज मुजोर झाले आहे, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, माफियांना साथ देणारे महसूल विभागातील अधिकारी आणि गुन्हे नोंदविताना आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही संबंधित वाळू माफियांच्या गुंडगिरीबद्दल वारंवार बोलत आहोत. तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधित अशा सर्व माफियांना अभय मिळाले. राष्ट्रवादीकडून मिळालेल्या संरक्षणाचा फायदा घेत या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. या गोष्टी येथून पुढील काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत. तत्कालीन राष्ट्रवादी नेत्यांनी आणलेले अधिकारी व पोलीस अजूनही तालुक्यात व जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून अजूनही संबंधित नेत्यांच्याच इशाऱ्यावर काम चालत आहे. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून प्रशासनाच्याच हिताची गोष्ट केली होती. तरीही त्यांना संरक्षण दिले गेले नाही. प्रशासकीय पातळीवरच अभय मिळत असल्याने या तस्करांचे धाडस वाढले आहे.
राजापूर येथील घटना पूर्वनियोजितच होती. धडधडीत भरदिवसा असे प्रकार होत असतील, तर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस काय करीत आहेत?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. आता राज्यात आमचे सरकार असले तरी, पूर्वीच्याच सरकारमधील काही तत्कालीन राष्ट्रवादी नेत्यांनी आपल्या मर्जीतले अधिकारी आणि पोलीस याठिकाणी बसविले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत यापुढे वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. ग्रामस्थांना संरक्षण देण्याचीही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही खा. संजय पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर पंचनामे होऊन जिल्ह्यातील द्राक्ष व डाळिंब बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे संजय पाटील म्हणाले.