राष्टवादीने ‘गड’ राखले : ताकद वाढविण्यासाठी मिळाली ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 02:35 PM2019-10-25T14:35:37+5:302019-10-25T14:37:26+5:30
विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या.
कोल्हापूर : जिल्ह्यात तीनपैकी दोन जागा जिंकत राष्टवादी कॉँग्रेसने आपला ‘गड’ कायम राखला. राधानगरीत मात्र पराभव टाळण्यात पक्षाला यश आले नाही. विधानसभा निवडणुकीतील ऊर्जा घेऊन राष्टवादीला जिल्ह्यात भक्कम बांधणी करावी लागणार आहे.
एकेकाळी कोल्हापूर जिल्हा राष्टÑवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला होता. बारापैकी निम्मे आमदार आणि तीन मंत्री या पक्षाचे होते. २०१४ ला कागलमधून हसन मुश्रीफ, तर चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर हे दोघेच निवडून आले होते; पण मध्यंतरीच्या काळात पक्षात मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने अनेक तालुक्यांत पक्षावर अस्तित्व शोधण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकीत तर उरलीसुरली जागाही राखता आली नाही. विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या. त्यात संध्यादेवी कुपेकर यांनी रिंगणातून माघार घेतल्याने चंदगडमध्ये पेच निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणी ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी बाजी मारली. कागलचा गड हसन मुश्रीफ यांनी कायम राखला; पण ‘राधानगरी’त के. पी. पाटील यांचा पराभव पक्षाला रोखता आला नाही.
राष्टÑवादीने गड कायम राखला असला तरी या ऊर्जेतून पक्षाला ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. इतर मतदारसंघांत कमकुवत असलेल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान पक्षनेतृत्वावर आहे.
- ‘यड्रावकर’ राष्टÑवादीसोबतच राहणार?
राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यांनी पक्षासोबतच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.