राष्ट्रवादी म्हणजे ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:36 AM2019-03-25T05:36:09+5:302019-03-25T05:36:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली. पवार म्हणतात की, सर्जिकल स्ट्राइक माझ्याच सल्ल्याने झाला. मग तुमच्या सल्ल्याने चालणारे सरकार सत्तेत येणार असेल तर पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसनेच लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
भाजपा-शिवसेना-रिपाइं युतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ येथील तपोवन मैदानावर जनसमुदायाच्या साक्षीने झाला. लोकसभेचे मतदान ही फक्त औपचारिकता राहिली असून राज्यातील सर्व ४८ जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. सर्व नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली व काँग्रेसला बेदखल केले.
सभेला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक आले होते. सभेत मुख्यमंत्री व ठाकरे यांनीही भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे जोरदार समर्थन केले व युतीचा या निवडणुकीतील प्रचार हिंदुत्वाभोवतीच केंद्रित होणार असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यानेच आम्ही प्रचाराची सुरुवात येथून केली. हे परिवर्तन आता राज्यभर घडणार आहे. काँग्रेसवाल्यांनी काल ५६ पक्षांच्या आघाडीची घोषणा केली. रस्त्यावर दिसेल त्याला पक्षात घेऊन ही आघाडी बनली आहे. देश चालवायला ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते. तुमच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. उमेदवार मिळेना झालेत. त्यामुळे युतीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने माथाडी कामगारांचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. शरद पवार यांना कृपा करून भाजपामध्ये घेऊ नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करून ठाकरे म्हणाले, कोल्हापूरची आजची सभा ही विजयाची मुहूर्तमेढ रोवणारी आहे. पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही अयोध्येत राममंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. आमची सत्ता आल्यावर पंतप्रधान मोदीच होतील परंतु तुमच्या ५६ पक्षांच्या कडेबोळ््याकडे उमेदवार कोण आहे, हे एकदा सांगावे. पश्चिम महाराष्ट्रातून युतीच्या खासदारांची रांग लागलेली दिसेल.
सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाषणे झाली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी संयोजन केले. सभेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांसह पश्चिम महाराष्ट्रातील
दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
लंगोटही काढून घेतले..
बारामतीचा पोपट असा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, हा पोपट नव्याने बोलू लागला आहे. त्याचे कपडे आम्ही विधानसभेला व महापालिका निवडणुकीत उतरविले. आता उरलासुरला लंगोटही उद्धव यांनी काढून घेतला. त्यामुळे आता तुम्ही शांत घरी बसा, सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका.
गिरीश महाजन यांची धडकी
गिरीश महाजन यांनी इतके बॉम्ब लावले की त्यांना नुसतं बघितले तरी विरोधकांना धडकी भरते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.