राष्ट्रवादीची रणनीती अधिकच आक्रमक !
By admin | Published: October 12, 2015 11:43 PM2015-10-12T23:43:02+5:302015-10-13T00:22:36+5:30
फलटणमध्ये गुप्त बैठक : जिल्ह्यातील आमदारांना अजित पवार यांचा कानमंत्र
फलटण : फलटण दौऱ्यावर बऱ्याच कालावधीनंतर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आमदारांची गुप्त बैठक घेऊन पक्षवाढीसह आगामी आंदोलनाची रणनीती ठरविली. फलटणमधील एका नगरसेवकाच्या आलिशान फार्महाऊसवर सोमवारी सायंकाळी ही बैठक घेऊन अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना कानमंत्र दिला.
सत्तेबाहेर असल्याने जिल्ह्यातील विकासकामांवर काय परिणाम होतोय व त्यातून काय मार्ग काढायचा याविषयी या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध माध्यमांतून विरोधकांचा शिरकाव होणार नाही, याकडे लक्ष देण्याचा व विरोधकांचे आक्रमण परतावून लावण्याचा संदेशही पवार यांनी यावेळी दिला.पक्षवाढीसाठी आणखी काय करता येईल?, विविध आंदोलने पूर्व ताकदीने कशी उभारायची?, याविषयीही चर्चा झाली. फलटण तालुक्यात एकहाती सत्ता ठेवणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा व त्यावरील उपाययोजनेचा आढावा घेताना अजित पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी विविध आमदारांची मते त्यांनी ऐकून घेतली. भविष्यात अधिक आक्रमकपणे काम करावे लागणार असल्याने त्या पद्धतीने तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे समजते. जिल्ह्यातील आगामी राजकारणाची रणनीती फलटणमधून अजित पवार यांनी ठरविली, असेही सांगितले जात आहे.
घारीप्रमाणे लक्ष
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारला मतदारांनी बाजूला सारून भाजप-शिवसेनेची सत्ता आणली. सातारा जिल्ह्याने मात्र राष्ट्रवादीला साथ दिली.
याचे फलित म्हणून रामराजेंना विधानपरिषदेचे सभापतिपद देण्यात आले. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर काका-पुतण्यांचे घारीप्रमाणे लक्ष असल्याचेच आता स्पष्ट होऊ लागले आहे.