सावकरांच्या नव्या भूमिकेमुळे ‘राष्ट्रवादी’ अडचणीत
By admin | Published: October 21, 2016 01:25 AM2016-10-21T01:25:30+5:302016-10-21T01:25:30+5:30
‘केडीसीसी’, ‘बाजार समिती’तील चित्र : राष्ट्रवादीला काँग्रेसशी जुळवून घ्यावे लागणार
राजाराम लोंढे --कोल्हापूर
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पारंपरिक मित्र माजी मंत्री विनय कोरे यांनी भाजपशी जवळीक करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील समीकरणे बदलणार आहेत. गेली अनेक वर्षे ‘जनसुराज्य’ पक्षाच्या मदतीने बहुतांश सत्तास्थाने ताब्यात ठेवणाऱ्या राष्ट्रवादीपुढे यामुळे पेच निर्माण झाला आहे. कोरे यांच्या भूमिकेमुळे ‘केडीसीसी’ व ‘बाजार समिती’मधील राष्ट्रवादीची सत्ता अडचणीत आली आहे. सध्या कॉँग्रेसशी जुळवून घेणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे.
राष्ट्रवादीशी फारकत घेऊन २००४ ला विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली; पण मैत्री कायम ठेवत दोघांनी हातात हात घालून कॉँग्रेसचा ‘हात’ रोखण्याचा प्रयत्न केला. कोरे यांच्या मदतीमुळे राष्ट्रवादीने ‘गोकुळ’ वगळता सर्वच सत्तास्थाने ताब्यात ठेवली. राष्ट्रवादीनेही मित्रपक्षाला राज्यासह जिल्हापातळीवरील सत्तेत स्थान दिले. राज्य मंत्रिमंडळात २००४ ते २००९ या कालावधीत कोरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन आपली मैत्री घट्ट केली. परंतु, २००९ ते २०१४ या कालावधीत कोरे यांना सत्तेपासून बाजूला ठेवल्याने ते काहीसे नाराज झाले. त्यात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांनी थेट विरोधात जाऊन विधानसभेला कोरेंना रोखल्याने अस्वस्थता वाढत गेली. राज्यातील सरकार बदलल्याने विनय कोरे भाजपमध्ये जाणार, या चर्चेला ऊत आला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही राष्ट्रवादीला हादरा देण्यासाठी रोज नवीन फासे टाकण्यास सुरुवात केल्याने राजकीय विश्लेषकांनी कोरे यांच्या प्रवेशाचे मुहूर्तही काढले; पण त्यांनी संयमाने घेत ‘श्रीमंताच्या महालापेक्षा माझी गरिबाची झोपडीच बरी’ असे उद्गार काढून प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे पक्षात येत नसल्याने किमान महाआघाडीत जनसुराज्यचा समावेश होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू केले. राजकीय परिस्थिती पाहता विनय कोरे यांना या तडजोडीशिवाय पर्यायच नव्हता.र् यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
जिल्हा बॅँकेची निवडणूक कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढविली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील इच्छुक होते. त्यास चंद्रकांतदादा यांचाही छुपा पाठिंबा होता; परंतु कोेरे यांनी आ. मुश्रीफ यांना पाठबळ दिल्याने पाटील यांचे गणित जमले नाही. दोन्ही काँग्रेसच्या समझोत्यानुसार अडीच-अडीच वर्षे अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला असला तरी कुरघोडीचे राजकारण पाहता ते शक्य नसल्याची जाणीवही कॉँग्रेसला आहे. सध्या जिल्हा बॅँकेतील बलाबल पाहिले तर राष्ट्रवादीचे नऊ, कॉँग्रेसचे आठ, जनसुराज्यचे दोन, तर शिवसेना व भाजपचे प्रत्येकी एक, असे २१ संचालक आहेत. त्यापैकी नरसिंगराव पाटील यांचे निधन झाले आहे. राष्ट्रवादीचे के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी राजीनामा देऊन त्याठिकाणी अनुक्रमे रणजितसिंह पाटील व (पान ६ वर)
कोण कोणाबरोबर राहू शकते -
जिल्हा बॅँक : राष्ट्रवादी : हसन मुश्रीफ, संतोष पाटील, निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, भैया माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय मंडलिक,
के. पी. पाटील (राजीनामा), ए. वाय. पाटील (राजीनामा). कॉँग्रेस : पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, अप्पी पाटील, राजू आवळे, विलास गाताडे, अशोक चराटी, उदयानी साळुंखे, नरसिंगराव पाटील (मृत). हुकुमाचे पत्ते :
पी. जी. शिंदे, विनय कोरे, सर्जेराव पाटील पेरिडकर, अनिल पाटील
‘गृहीत धरण्याच्या राजकारणाला हादरा !
राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते ‘जनसुराज्य’ला गृहीत धरूनच राजकारण करीत होते. कॉँग्रेसने सोबत घेतले की, जनसुराज्यला कट्ट्यावर बसवून सत्तेची फळे चाखायची आणि गरज लागली की, पुन्हा जनसुराज्यला जवळ करण्याचे काम राष्ट्रवादीने केले. त्याची सल ‘जनसुराज्य’च्या मनात होती. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीच्या गृहीत धरण्याच्या राजकारणाला हादरा दिला आहे. पी. एन.’ राष्ट्रवादीला अंगावर घेणार का ?
जिल्'ह्याच्या राजकारणात चंद्रकांतदादांना राष्ट्रवादीची कोंडी करायची आहे. त्यामुळे कॉँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीचा काटा काढायचा, असा प्रयत्न होऊ शकतो; पण आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकारण पाहता कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे राष्ट्रवादीला अंगावर घेतील का ? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.