‘राष्ट्रवादी युवक’चे उद्या टोलविरोधी आंदोलन
By admin | Published: March 23, 2015 12:20 AM2015-03-23T00:20:53+5:302015-03-23T00:38:33+5:30
शहरातील टोलनाके बंद पाडणार : आदिल फरास
कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे अनेक प्रकारे आंदोलन करूनही शहरातील टोल ‘जैसे थे’ आहे. भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांत ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा केली होती. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी युवक प्रदेशतर्फे राज्यातील सर्व टोल नाके मंगळवारी (दि.२४) एक दिवस बंद करण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व टोल नाके यादिवशी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत बंद केले जाणार आहेत. या आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी रविवारी शहर युवक राष्ट्रवादी कमिटीच्या बैठकीत केले.केंद्र व राज्य शासनाने निवडणुकीदरम्यान दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही तसेच निवडणुकीत टोलमुक्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक प्रदेशतर्फे राज्यव्यापी ‘टोल बंद’चे आंदोलन हाती घेतले आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवकचे शहर अध्यक्ष व स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
मंगळवारी अत्यंत तीव्रपणे आंदोलन करत शहरातील सर्व टोलनाके बंद करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शहरातील सर्व नऊ टोल नाके बंद करून त्याठिकाणी आंदोलन करण्याची जबाबदारी वाटप करण्यात आली. आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केल्यास ‘जशास-तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशाराही फरास यांनी दिला.यावेळी अमित डोंगरसाने, प्रदीप पाटील, युवराज साळोखे, अमित पाटील, योगेश इंगवले, जाफर मलबारी, हंबीरराव पाटील, सुनील परिट, नितीन मस्के, नीलेश सूर्यवंशी, मंदार पावस्कर, राणोजी चव्हाण, उत्तम बिरांजे, संदीप चौगले, सचिन नवले, सचिन वेर्णेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)