...तर राष्ट्रीयीकृत बँका चालू देणार नाही

By admin | Published: December 26, 2016 09:38 PM2016-12-26T21:38:57+5:302016-12-26T21:38:57+5:30

हसन मुश्रीफ यांचा इशारा : एटीएमसमोर जनावरे बांधू; गोरंबे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

... nationalized banks will not be able to ... | ...तर राष्ट्रीयीकृत बँका चालू देणार नाही

...तर राष्ट्रीयीकृत बँका चालू देणार नाही

Next

म्हाकवे : काळा पैसा बंद करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे परदेशातील काळा पैसा आणून आम्हा सर्वांच्या खात्यावर पंधरा लाख भरण्याची आम्ही वाट बघत आहोत, तर दुसरीकडे ५० दिवसांत नोटाबंदीमुळे बिकट झालेली परिस्थिती सुधारण्याची आशा पंतप्रधान दाखवीत आहेत. २८ तारखेला ही ५० दिवसांची मुदत संपत आहे, त्यानंतर परिस्थिती न सुधारल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल. आम्ही राष्ट्रीयीकृत बँका चालू देणार नाही. एटीएमसमोर जनावरे बांधण्याचा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
गोरंबे (ता. कागल) येथे ग्रामविकास महाआघाडीच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच पांडुरंग पाटील होते.
मुश्रीफ म्हणाले, स्वत:च्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते, यासारखे दुर्दैव नाही. याशिवाय आघाडी सरकारने गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या धान्य, केरोसीन, गरिबांची पेन्शन बंद करण्याचा घाट भाजप सरकारने घातला आहे; परंतु मी या अडीच हजार लाभार्थ्यांची पेन्शन पुन्हा सुरू करून ती सहाशेवरून दोन हजार रुपये प्रतिमहिना केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जनतेने मला चारवेळा आमदार व तीनवेळा मंत्री होण्याची संधी दिली. त्यामुळेच मी माझ्या आयुष्यातला क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी वेचला. गट-तट न बघता आजही आठवड्याला किमान दहा मोफत आॅपरेशन माझ्या फौंडेशनमार्फत केली जातात.
जयसिंग पाटील, दत्ता पाटील-केनवडेकर, पिंटू दावणे यांची भाषणे झाली. बळवंत पाटील, शहाजी पाटील, उपसरपंच लता अरुण चौगुले, साताप्पा इंगळे, विष्णू कांबळे, नारायण पाटील, दत्ता दंडवते, प्रकाश चौगुले, तानाजी बुडके, संजय दादू पाटील, हिंदुराव बुजवडे, ईश्वरा पाटील, प्रवीण सुतार उपस्थित होते. सरपंच शिवाजी बाजीराव पाटील यांनी स्वागत केले. चंद्रकांत पाटील (हुरे) यांनी आभार मानले. (वार्ताहर)


देशात प्रथम क्रमांकाचा दर देऊ
कागलच्या शाहू आणि हमीदवाडा येथील साखर कारखान्यांत आपले योगदान असूनही आपल्याला या कारखान्यांत राहता आले नाही, याचे शल्य व्यक्त करून आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, आता आपला घोरपडे कारखाना सुरू होऊन दोनच वर्षे झाली आहेत. अजून त्याचे कर्जाचे पाच हप्ते देणे बाकी आहे. त्याची परतफेड झाल्यानंतर हा साखर कारखाना देशात पहिल्या क्रमांकाचा दर देईल.

मी झोळी घेऊन आलो म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींनी सर्वांनाच झोळी घ्यायला लावल्याचा टोला लगावून राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा त्यांनी दिला.

राज्यात आदर्श सरपंच
गट-तट न बघता स्वत:ला झोकून देऊन किती चांगल्याप्रकारे गावचे काम करता येते याचे आदर्श उदाहरण म्हणून शिवाजी पाटील यांच्याकडे बघावे लागेल, असे गौरवोद्गार आमदार मुश्रीफ यांनी काढले.

Web Title: ... nationalized banks will not be able to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.