नववर्षाच्या सुरुवातीलाच रेशन दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत बंद, कोल्हापूर जिल्ह्यातील १६७० दुकानदार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 05:39 PM2023-12-30T17:39:06+5:302023-12-30T17:39:19+5:30

प्रलंबित मागण्यांसाठी निकराचा लढा

Nationwide indefinite strike of ration shopkeepers at the beginning of the new year, 1670 shopkeepers of Kolhapur district participated | नववर्षाच्या सुरुवातीलाच रेशन दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत बंद, कोल्हापूर जिल्ह्यातील १६७० दुकानदार सहभागी

नववर्षाच्या सुरुवातीलाच रेशन दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत बंद, कोल्हापूर जिल्ह्यातील १६७० दुकानदार सहभागी

कोल्हापूर : धान्यावरील कमिशनमध्ये वाढ, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी साेमवारपासून (१ जानेवारी) रेशन दुकानदारांनी देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ६७० दुकानदार सहभागी होत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव व काेल्हापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाचा खर्च भागत नाही. महागाईचा उच्चांक असताना अनेक वर्षे मागणी करूनही शासनाने कमिशन वाढविलेले नाही. कोरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून दुकानदारांनी नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविले, काहीजणांचा मृत्यू झाला तरी शासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. पॉस मशीनमध्ये वारंवार बिघाड होऊन दुकानदारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.

केरोसीन व्यवसाय बंद केल्याने ५५ हजारांवर व्यावसायिक रस्त्यावर आले. यापैकी कोणत्याही विषयात शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांची दखल घेतली नाही. देशपातळीवर झालेल्या संघटनेच्या निर्णयानुसार सोमवारपासून दुकाने बेमुदत बंद राहतील व १६ जानेवारीला रामलीला मैदान ते संसद भवनपर्यंत जाऊन पंतप्रधानांना निवेदन दिले जाईल.

यावेळी दीपक शिराळे, करवीर अध्यक्ष संदीप पाटील, नामदेव गावडे, गजानन हवालदार, राजेश मंडलिक, सुनील दावणे, सुरेश पाटील, नयन पाटील, सागर मेढे, श्रीपती पाटील, संदीप लाटकर,साताप्पा शेणवी उपस्थित होते.

Web Title: Nationwide indefinite strike of ration shopkeepers at the beginning of the new year, 1670 shopkeepers of Kolhapur district participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.