खासदार निलंबन कारवाई विरोधात उद्या इंडिया आघाडीच्यावतीने देशभर निदर्शने
By विश्वास पाटील | Published: December 21, 2023 03:06 PM2023-12-21T15:06:07+5:302023-12-21T15:06:32+5:30
महाराष्ट्रातील सर्व प्रागतिक पक्ष निदर्शनात सहभागी होणार
कोल्हापूर - खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाई मधून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या दडपशाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी देशात सर्वत्र निदर्शने करण्याची हाक दिली आहे. प्रागतिक पक्षांच्या आघाडीमधील सर्व घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी आपापल्या भागातील निदर्शनामध्ये संपूर्ण शक्तीनिशी सहभागी व्हावे. शक्य व आवश्यक असेल, तेथे पुढाकार घ्यावा. तसेच इंडिया आघाडीमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यासह एकत्रित निदर्शने करण्यात यावीत असे प्रागतिक पक्षांच्या आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आले. या आघाडीच्यावतीने प्रा. एस व्ही जाधव, प्रताप होगाडे, ॲड.डॉ. सुरेश माने, उदय नारकर यांनी ही माहिती दिली.
निलंबित खासदारांवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकसभेतून एकूण 95 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर 46 सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे...
संसदेच्या कामकाजानंतर इंडिया आघाडीने शुक्रवारी देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार शक्य त्या सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात यावीत असे आवाहन प्रागतिक पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनात खालील प्रागतिक पक्ष सहभागी होत आहेत.
शेतकरी कामगार पक्ष,
स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना,
समाजवादी पार्टी,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,
भारतीय कम्युनिस्ट पार्टी,
जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र,
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी,
बहुजन विकास आघाडी,
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष,
लाल निशाण पक्ष,
भाकपा (माले) लिबरेशन पार्टी,
रिपाई (सेक्युलर) पार्टी,
श्रमिक मुक्ती दल.