डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ देशव्यापी संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:30+5:302021-06-29T04:16:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सरकारने ही भाववाढ कमी करावी, अशा मागणीचे निवेदन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सरकारने ही भाववाढ कमी करावी, अशा मागणीचे निवेदन दि गुडस् ट्रान्स्पोर्ट, वेअर हाऊस, लॉरी ऑपरेटर असोसिएशन, टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशन, दि मॅचेस्टर ट्रक मोटर मालक संघाच्यावतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले.
निवेदनात सदरच्या संघटना या मालवाहतूकधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉँग्रेस, नवी दिल्ली या देशव्यापी, शिखर संघटनेशी संलग्न आहेत. मालवाहतूक व्यवसाय हा पूर्णपणे मागणी व पुरवठा या तत्त्वावर चालतो आहे.
सन २०१९ पासून व्यापार, उद्योग कमी-अधिक प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे व्यवसायात जवळपास ५० टक्के घट होत आहे. यातच डिझेलच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने व्यवसाय करणे अत्यंत कठीण झाले आहे. वाहनधारकांची देणी थकीत होत असल्याने फायनान्स कंपनी वाहने जप्त करत आहेत. मोटार वाहन कायदा नियम ६७ (१) नुसार अपेक्षित सक्षम यंत्रणा नसल्याने मालवाहतूकदारांना ट्रक चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात देशभरातील मालवाहतूकदारांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करून काळी फित बांधून दरवाढीचा निषेध व्यक्त केला. पुढील काळात अशीच दरवाढ सुरू राहिल्यास किंवा दरात घट न झाल्यास ऑगस्ट २०२१ मध्ये बेमुदत संप करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळात अशोक शिंदे, भरतसिंह चौधरी, मिश्रीलाल जाजू, सचिन जाधव, सुरेश साळुंखे, बाळू लाखे, जितेंद्र जानवेकर, सनी गोराडे, दत्ता थोरात आदींसह असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
फोटो ओळी
२८०६२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत विविध ट्रान्स्पोर्ट संघटनांच्यावतीने प्रांत कार्यालयात अप्पर तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
छाया-उत्तम पाटील