निसर्ग, इतिहासात पुढे; विकासात माग
By admin | Published: December 13, 2014 12:12 AM2014-12-13T00:12:34+5:302014-12-13T00:14:24+5:30
पारगड : शासन व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षांमुळे विकासापासून वंचिते
चंदगड-नंदकुमार ढेरे दगडला प्रति मिनी महाबळेश्वची ओळख निर्माण करून देणारा ऐतिहासिक किल्ले पारगड सुविधांअभावी आजही प्राथमिक अवस्थेत आहे. शासन व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षांमुळे हा किल्ला विकासापासून वंचित राहिला आहे. केवळ पारगडचा विकास केल्याचा दावा आजपर्यंत अनेकांनी केला. मात्र, प्रत्यक्ष पारगडावर जाऊन पाहिले असता, पारगड मूळ रूपातच पाहायला मिळेल.
रायबा मालुसरे होता किल्लेदार
तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याची गडावर नेमणूक केली होती. १६८९ च्या दरम्यान मुगल शहजादा मुआज्जम व खावासखान यांच्या आक्रमणात महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे शहीद झाले होते. तानाजी मालुसरे, विठोजी माळवे यांचे वंशज, शेलार, गडकरी तसेच इतर कुटुंबे महाराजांची आज्ञा म्हणून आजही या गडावर वास्तव्य करून आहेत. उदरनिर्वाहासाठी बहुतेक तरुण वर्ग मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. सध्या गडावर फक्त ४0 ते ५0 कुटुंबांचे वास्तव्य असून, या घरांमध्ये फक्त वृद्ध महिला व पुरुष पाहायला मिळतात.
अलीकडच्या काळात पारगडचा विकास करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी केले होते. पर्यटन आणि निसर्गसौंदर्यामुळे हा भाग मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातोे. कोदाळीचे प्राचीन माऊली मंदिर, तिलारीचा अवघड घाट, नागमोडी वळणे, रातोबा पॉर्इंट, हिल्स, कॅनॉल, वीजघर, तिलारी डॅम, ड्रिमलँड पॉर्इंट (स्वप्निल पॉर्इंट), पारगडच्या ३६० पायऱ्या, प्रवेशद्वार, शिवकालीन तोफा, हनुमान मंदिर, भवानी मातेचे मंदिर, मंदिरातील शिवकालीन चित्ररूपी इतिहास, गडावर खोदलेल्या १७ विहिरी (सध्या चार विहिरी आहेत), टेहळणी बुरूज, भुयार, इत्यादींमुळे हा गड शिवकालीन इतिहास उभा करतो.
गडावरील सोय
पारगड परिसर पाहण्यासाठी चंदगडपासून एस.टी.ची सोय आहे. दुचाकी, चारचाकी वाहने गडावर जाऊ शकतात. गडावर पर्यटकांना राहण्यासाठी ग्रामस्थांनी भक्त निवासाची सोय केली आहे. तसेच कोदाळी ग्रामस्थांच्या देखरेखाली वन खात्याचे ग्रीन व्हॅली रिसोर्ट उभारले आहे. येथे सर्व सुविधा आहेत. पर्यटकांना हा भाग पावसाळ्यात, हिवाळ्यात व उन्हाळ्यातही पर्यटनासाठी खुणावत आहे.
गडाचे स्थान
चंदगड तालुक्यात पारगड, कलानंदीगड, महिपाळगड,व गंधर्वगड हे चार गड शिवकालीन असून, छ. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत. या चारच किल्ल्यांपैकी चंदगडपासून साधारणत: ३५ कि. मी. अंतरावर पारगड आहे. शिवाजी महाराजांनी सिद्धी, पोर्तुगीज व डच आदींपासून स्वराज्याचे संरक्षण व्हावे म्हणून सागरी किल्ले उभारले. गोव्यातील पोर्तुगीजांवर नजर ठेवण्यासाठी पारगड व कलानंदीगडची उभारणी केली.
प्रसिद्धीची गरज
पारगड निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वाची खाण आहे. वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये येथे पर्यटनाचा आनंद घेता येतो; पण या गडाबाबत राज्यपातळीवर फारशी प्रसिद्धी नाही. पर्यटन विकासमंडळाने येथील नैसर्गिक विपुलता आणि याच्या ठिकाणाचे महत्त्व केंद्रस्थानी योग्य मार्के टिंग केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होतील. ट्रेकिंग, जंगल सफारी अशा साहसी प्रकारांची आवड असणाऱ्यांसाठी हे नवे डेस्टिनेशन ठरू शकते.
पारगडला हे हवे...
ढासळलेल्या तटबंदीचे ाुनर्बांधकाम
२) पर्यटकांसाठी टेन्ट हाऊस
बांबू पॅलेस)
३) हॉटेलची सोय
स्विमिंग पूल ४गार्डन ४रोप वे
गिर्यारोहण, आदी सोयी पर्यटन विभागाच्यावतीने करणे शक्य.
किल्ले पारगडचे वेगळेपण...
इ.स. १६व्या शतकात उभारण्यात आलेल्या पारगडची खासीयत वेगळीच आहे. घणदाट अरण्य, दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, खोल दऱ्या, दूरवर पसरलेला गोव्याचा समुद्र किनारा, आकाशाला स्पर्श करू पाहणारी ताडा-माडांची झाडे, अंगाला झोंबणारा वारा, धबधबे, तसेच वन्यजीवांचे दर्शन होते.
निसर्गाने पारगड ते कलानंदीगडच्या परिसराला भरभरून देणगी दिली आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकाला हा परिसर मोहित करून सोडतो. सिंधुदुर्ग व गोव्याजवळ असलेला पारगड किल्ला साधारणत: ४८ एकरांमध्ये वसविण्यात आला होता.
समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंचीवर हा गड असून, स्वराज्याच्या शत्रू सैन्यांना कधीही जिंकता न आल्याने पारगडला अजिंक्यगड म्हणून ओळखले जाते. तसेच स्वराज्याच्या शेवटच्या टोकावर हा गड असल्याने त्याचे नाव पारगड ठेवण्यात आले आहे. गडाची वास्तू ते प्रवेशापर्यंत स्वत: महाराज या किल्ल्यावर राहिले होते. महाराजानी सूर्य, चंद्र असे तोपर्यत या गडाचे रक्षण करावे, असा आदेश सहकाऱ्यांना दिला होता.