कोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:16 PM2021-06-07T17:16:07+5:302021-06-07T17:17:10+5:30
CoronaVirus Kolhapur : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांनी जणू काही जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले.
कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांनी जणू काही जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले.
संपूर्ण महाराष्ट्रात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनलॉकचे जे पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यातील चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तरीही सोमवारपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला हा मोठा दिलासा आहे.
गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण शहराला एक प्रकारची मरगळ आली होती. कडक निर्बंध, लॉकडाऊन यामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. कुठे जाण्यावर, स्वैरपणे हिंडण्यावर, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त चालण्यावर , बाजारपेठेत खरेदी करण्यावर बंधने आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे सोमवारी ही बंधने शिथिल झाली.
त्यामुळे शहरातील महाद्वार, ताराबाईरोड, भाऊसिंगची रोड, लक्ष्मीपुरी, गंगावेश, बागलचौक, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, कोळेकर तिकटी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड परिसरातील गर्दीने शहराला जीवंतपणा आला. नागरीकांच्या झुंडी रस्त्यावरुन जाताना दिसत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांची जशी लगबग होती, तशी भाजीपाला, जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही झुंबड उडाली होती.
दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांनी रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांचा रांगा आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील चौका चौकात असणारे सिग्नल सुध्दा दीड महिन्यांनी प्रथमच सुरु झाले. गर्दीवर, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते.