कोल्हापूर-गगनबावडा मार्गाला ओढ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:04+5:302021-07-23T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर नालेसफाई झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. सार्वजनिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर नालेसफाई झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरवर्षी नालेसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची दुरवस्था होते. पण वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग कोकण व कोल्हापूर जिल्हा जोडणारा म्हणून महत्त्वाचा मार्ग आहे. अत्यंत महत्त्वाचा या मार्गाची देखभाल करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने या मार्गाचे पावसाळ्यात नुकसान होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला असला तरी तो सुस्थितीत राहण्यासाठी लागणारे उपाय करण्याकडे संबंध विभागाचे दुर्लक्ष होतानाचे चित्र पहायला मिळत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्ग शिंगणापूर फाट्यापासून गगनबावड्यापर्यंत ५७ किमी निसर्गरम्य आहे. २५० वळणे असलेल्या या मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यामुळे नालेसफाईत अडथळे येत असले तरी संबंधित विभागाने मनात आणले तर ते सहज शक्य होणार आहे. हा मार्ग प्रचंड पावसाच्या परिसरातूनच जात असल्याने नालेसफाई झाली नसल्याने वाहून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यात खड्डे पडणे, बाजूपट्टी खचणे याशिवाय पाणी रस्त्यावरच साचत असल्याने ओढ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे.
चौकट
मोहऱ्या बंद करण्याचे प्रकार
या रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या पाणी निचऱ्यासाठी ठेवण्यात आलेल्या मोहऱ्या अनेक ठिकाणी बंद करण्याचा प्रकार झाले आहेत.
रस्त्याच्या साईडपट्टीवर फलक-
दुकाने, हॉटेल, दवाखाने यांसह अन्य नावाचे फलक थेट रस्त्याच्या साईडपट्टीवर लावण्यात आलेले आहेत.
फोटो
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर नालेसफाई झाली नसल्याने पावसाचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यावर वाहत असल्याने ओढ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे.