निसर्गवेडा चित्रकार- कोल्हापूर स्कूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:02 AM2018-10-05T00:02:46+5:302018-10-05T00:07:44+5:30

खरं म्हणजे कलापूरच्या चित्रशिल्प पंरपरेचा इतिहास आणि वारस्याबद्दल कोल्हापूरचे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीयुत शामकांत जाधव जे अद्यापही कुंचले आणि लेखनी यामध्ये आनंदी व मग्न आहेत. त्यांनी एका विशिष्ट शब्दशैलीमध्ये या चित्र-शिल्प परंपरेचे रेखाटन ‘रंग

NatureWedding paintings- Kolhapur school | निसर्गवेडा चित्रकार- कोल्हापूर स्कूल

निसर्गवेडा चित्रकार- कोल्हापूर स्कूल

Next

- शिवशाहीर डॉ. राजू राऊत

खरं म्हणजे कलापूरच्या चित्रशिल्प पंरपरेचा इतिहास आणि वारस्याबद्दल कोल्हापूरचे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीयुत शामकांत जाधव जे अद्यापही कुंचले आणि लेखनी यामध्ये आनंदी व मग्न आहेत. त्यांनी एका विशिष्ट शब्दशैलीमध्ये या चित्र-शिल्प परंपरेचे रेखाटन ‘रंग चित्रकारांचे’ या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले आहे. ते एका अर्थाने कोल्हापूरचे कलाक्षेत्रातील गॅजेटच म्हणावे लागेल.

काही ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून त्यांनी केलेल्या कलाकाराचे जे मूल्यमापन आहे त्याला वेगळ्या कुठल्या पद्धतीने परत तिच ओळख करून देणे म्हणजे एक अवघडच काम आहे. त्यांचे वैयक्तिक आकलन, त्यांची शब्द संपत्ती, त्यांचे त्या कलाकाराशी असलेले नाते, पाहिलेली त्यांची हजारो चित्रे व हरएक चित्रकाराच्या निर्मितीवर त्यांच्या अनेक प्रज्ञावंत सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून, उहापोहातून त्या प्रत्येक चित्रकाराची ओळख त्यांनी अशी काही करून दिली आहे की, त्या ओळखीशिवाय त्या चित्रकाराची दुसºया पद्धतीने ओळख करून देणे हे केवळ अशक्य आहे.

आणि अगदी नेमकी हीच गोष्ट तंतोतंत निसर्गप्रेमी चित्रकार श्रीयुत ए. टी. पाटील सर यांच्याविषयी आहे.
‘आकाश आणि जमीन ही या चित्रकाराची श्रद्धास्थाने!. म्हणून त्यांच्या चित्रांमध्ये पुरोभूमी आणि पार्श्वभूमी समृद्ध आविष्कारांनी नटलेली पाहायला मिळते. त्यांच्या चित्रातलं आकाश विविध भावाविष्कारांनी फळाला आलेलं दिसतं. जमीन तर अनेक रंगाविभ्रमाचा खजिना. तिचे पोत रसिकतेची द्वारं उघडणारे.’

वरील त्यांच्याच शब्दातील वर्णनाप्रमाणे तंतोतंत ए. टी. पाटील सर यांच्या चित्रजीवन शैलीतील प्रवास दिसून येतो. हजारो निसर्गदृश्यांची निर्मिती करीत कोल्हापूर ते दिल्ली भारतातील अनेक गावांमध्ये अनेक चित्र प्रदर्शन पार पाडणारे उदा. मुंबई, पुणे, वाराणसी, दिल्ली या शहरांमधून आपल्या अंगी असणाºया चित्रशिल्पातून जिवंत लसलसत्या ओल्यागार निसर्गाचे एक वेगळं रूप त्यांनी जगापुढे आणलं. डोंगर, पठार, जलाशय, आकाश, कुंपणं, झाडंझुडपं, बागा, समुद्र, सूर्यास्त,चंद्रोदय, घरं, माणसं या सर्वांचा वावर त्यांच्या चित्रात प्रामुख्याने आढळतो. आकारांच्या बांधणीतून आणि रंगाच्या स्पर्श किमयेतून त्यांची अशी चित्रे अवतरत.

अनेक पौरात्त्य व पाश्चिमात्य चित्रकारांच्या प्रभावासहित थेट आबालालपर्यंतच्या प्रभावातून त्यांच्या जीवनजाणिवा, मूल्ये, प्रेरणा यांची जडणघडण झाली होती. आणि ती इतकी घट्ट आणि बळकट होती की, स्वत: ए. टी. पाटील सर प्रकृतीने मृदू आणि मितभाषी असले तरी या चित्रकारांच्या चित्रांचा परिणाम हा कॅनव्हासवर अतिशय ठळक आणि ठसठसीत असायचा. त्यांच्या कॅनव्हासलाही विशिष्ट अशा आकारांची मर्यादा कधीच नव्हती. कधी चौरस, कधी लंबचौकोन, कधी उभट, लांबट, नानाविध प्रकारच्या आकारमानात समोरच्या निसर्गाला ते अगदी लिलया ‘कंपोज’ करीत गेले आणि भारतीय चित्रकारांच्या मालिकेतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार म्हणून ते मानांकित झालेच, शिवाय हजारो चित्रांची निर्मिती करीत त्यांचे अनेक विद्यार्थी आज नावारूपाला येऊन त्यांचे विषय, त्यांची शैली, त्यांची परंपरा थोडक्यात जातकुळी सांगत अभिमानाने मिरवत आहेत.

खरं तर कोणी एके काळी देव-देवता, ऐतिहासिक पुरुष यांच्या चित्रांच्या मागे बॅकग्राऊंड म्हणून किंवा एखाद्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक प्रसंगाच्या मागे स्थळमहिमा सांगण्यासाठी, लोकेशन दाखविण्यासाठी उपयोगात येणारी ही निसर्ग चित्ररेखाटन कला पाश्चिमात्य लोकांच्याकडून दीड-पावणे दोनशे वर्षांपूर्वी भारतात रुजली. त्या काळापासून अनेक प्रतिभावान चित्रकारांनी ती आपलीशी करीत आपल्या ठायी असणाºया यथामती, यथाशक्ती कौशल्याने तिच्यावर संस्करण करीत या निसर्गचित्र रेखाटन कलेला बहर आणला,
खुलवली, रसिकांच्यापुढे प्रांजलपणे मांडली. कोल्हापूरच्या तर आबालाल यांनीे अवघे आयुष्यभर हा वसा मिरवला. कदाचित, त्यांचे बलस्थान हा कोल्हापूर आणि कोल्हापूर भागातील अत्यंत देखणा असा निसर्गच होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्यांनी घालून दिलेल्या

या समृद्ध अशा वाटेवरूनच वाटचाल करीत श्रीयुत ए. टी. पाटील सर हे अतिशय तरल मनाने या भावविश्वाशी सलगीचे नाते जोडत. तसेच कोल्हापूरच्याकला परंपरेशी निगडित निसर्गचित्र या कला प्रकारात त्यांनी वेगळी अशी ओळख करून ठेवली आहे.

 

kollokmatpratisad@gmail.com

Web Title: NatureWedding paintings- Kolhapur school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.