आजऱ्यात आजपासून नाट्यमहोत्सव
By admin | Published: January 8, 2015 12:17 AM2015-01-08T00:17:21+5:302015-01-09T00:07:40+5:30
‘नवनाट्य’चे संयोजन : नामांकित सात नाट्यसंघाचा सहभाग
आजरा : आजऱ्याचे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील नवनाट्य मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवास उद्या, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नाट्यचळवळीची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या आजऱ्यात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवात कौटुंबिक, सामाजिक, समांतर रंगभूमी या नाट्यप्रकारांचा समावेश असून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित सात हौशी नाट्यसंस्था सहभागी झाल्या आहेत.
उद्या सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ सिनेअभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते आणि नवनाट्य मंडळाचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे उद्घाटन होईल. सर्वोत्कृष्ट तीन नाटकांची निवड प्रेक्षकांच्या पसंतीने होणार आहे. दररोज सायंकाळी ठिक ७ वाजता आजरा हायस्कूलच्या खुल्या रंगमंचावर हे नाट्यप्रयोग होतील. विजेत्या संघाचा कै. रमेश टोपले स्मृतिचषक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
गोकुळ दूध संघ, आण्णा भाऊ आजरा तालुका शेतकरी सूतगिरणी, आजरा साखर कारखाना, रवळनाथ को-आॅप. हौसिंग फायनान्स सोसायटी, आजरा अर्बन बँक, मिनर्वा ग्रुप आजरा व विजयकुमार पाटील इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर हे या महोत्सवाचे प्रायोजक आहेत.
संपूर्ण महोत्सवासाठी ५०० रुपयांची प्रवेशिका, तर दैनंदिन प्रवेशिकेसाठी १०० रुपये शुल्क ठेवले आहे. नाट्यमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर मुंज, आय. के. पाटील, भैया टोपले, शरद टोपले, डॉ. अंजनी देशपांडे, नवनाट्य मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
महोत्सवात सहभागी नाटके व संस्था
गुरुवार, दि.८ - शांतता कोर्ट चालू आहे (समाराधना, सोलापूर), शुक्रवार, दि.९, सुखांशी भांडतो आम्ही (सिद्धांत, कुडाळ), शनिवार, दि.१०- लोककथा ७८ (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), रविवार, दि.११- नटसम्राट (सुगुन, कोल्हापूर), सोमवार, दि.१२ - आर्य चाणक्य (अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर, सांगली), मंगळवार, दि.१३ - तर्पण (अखिल भारतीय नाट्य परिषद, सांगली), बुधवार, दि.१४-लेकरे उदंड जाहली (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ).
आजऱ्याच्या नाट्यचळवळीला सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या नवनाट्य मंडळाने ही परंपरा पुढे चालविली आहे. नाटकांना प्रादेशिकसह राज्य पातळीवरील पुरस्कारदेखील मिळाले, तर दिवंगत दाजी टोपले सरांना अभिनय व दिग्दर्शनाचा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. या नाट्यमहोत्सवामुळे आजऱ्याच्या नाट्यचळवळीला नवी ऊर्जा मिळेल. - प्रा. सुधीर मुंज, अध्यक्ष, संयोजन समिती, आजरा.