वळंजूंसमोर नवख्यांचे ‘आव्हान’
By admin | Published: October 22, 2015 12:39 AM2015-10-22T00:39:38+5:302015-10-22T00:53:21+5:30
लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा : सहाजण रिंगणात; साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब
कोल्हापूर : शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासमोर नवख्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. या प्रभागात सहा उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख पक्षासह अपक्षही रिंंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची विजयी होण्यासाठी कसोटी लागणार आहे. प्रभागात शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब होणार आहे. लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.
प्रभागात राष्ट्रवादीकडून शादाब नजमल अत्तार, काँग्रेसकडून दत्ता दौलतराव कांबळे, शिवसेनेकडून नियाज असिफ खान, ताराराणी आघाडीकडून नंदकुमार आनंदराव वळंजू, तर अपक्ष म्हणून निहाल फिरोज खान, अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सचिन मारुती सोनटक्के निवडणूक रिंगणात आहेत. वळंजू सन १९९५ ते २००० मध्ये जुना राजवाडा प्रभागातून नगरसेवक होते. २००० ते २००५ अखेर शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागातून ते नगरसेवक होते. २००० साली त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी मिळाली. वीस महिने ते महापौरपदावर होते. याशिवाय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. नगरसेवक, महापौर, बाजार समितीचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले असल्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी जिंकण्यासाठी सोपी आहे, असा त्यांचा दावा आहे. यावेळी ते ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत. अनेक निवडणूक लढविण्याचा आणि जिंकण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार महाडिक यांची रसद मिळणार आहे. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसकडून रिंगणात असलेले कांबळे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. समाजकारण आणि राजकारण यामध्ये रस असल्यामुळे सन २००० मध्ये वाहकपदाचा राजीनामा देऊन पहिल्यांदाच महापालिका निवडणूक रिंंगणात उतरले; पण यश मिळाले नाही. सातत्याने समाजकारणात सक्रिय राहिले. प्रभागातील लोकांच्या अडचणी समजावून घेणे, मदतीला धावून जाणे असा त्यांचा स्वभाव आहे. प्रभागात त्यांचा संपर्कही चांगला आहे. काँग्रेससोबत असणाऱ्या पारंपरिक मतदारांची संख्या प्रभागात आहे. वळंजू यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे यावेळी मला संधी आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीकडून शादाब अत्तार रिंगणात आहेत. पक्षाच्या माध्यमातून त्यांचाही संपर्क चांगला आहे. प्रभागात मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. अत्तार हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे फायदा होणार आहे. महापौर वळंजू यांच्या विरोधात अत्तार यांना निवडून आणण्यासाठी अत्तार यांच्यासाठी पक्षानेही ताकद लावली आहे. शिवसेनेकडून नियाज खान रिंगणात आहेत. तेही मुस्लिम समाजाचेच आहेत. त्यामुळे अत्तार आणि नियाज यांच्यात समाजाची मते मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. प्रभागात शिवसेनेचीही ताकद आहे, त्याचाही फायदा नियाज यांना होणार आहे. अपक्ष म्हणून निहाल खानही लढत आहेत. मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे या समाजाची मतांमध्ये विभागणी होणार आहे. रिंगणातील सर्वच उमेदवार मीच निवडून येणार, असा दावा करीत आहेत.
बिग फाईट
प्रभागात ४ हजार २०० मतदार आहेत. मुस्लिम ४५०, ढोर ३५०, मराठा ९००, डोंबारी ६५०, वीरशैव कक्कय्या ७५०, ब्राह्मण ६०० असे सर्वसाधारपणे मतदार आहेत. झोपडपट्टीत साडेसातशे मतदार आहेत. तेथे शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप करून गठ्ठा मतदानासाठी ताकद लावली जाते.