कोल्हापूरच्या फुटबॉलला संशोधनातून नवी दिशा
By Admin | Published: October 8, 2015 12:01 AM2015-10-08T00:01:24+5:302015-10-08T00:01:24+5:30
जागतिक खेळाडू तयार होण्यासाठी हवी अकॅडमी : अभिजित वणिरे --‘कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंची अभिवृत्ती’ या विषयावर पीएच.डी.
कोल्हापूरच्या संस्थानकालापासून सुरू असलेल्या फुटबॉल खेळास प्रथमच एक अभ्यास म्हणून आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निर्माण करण्यासाठी खेळाडूंच्यावर संशोधनाची एक गरज होती. ती गरज ओळखून शिवाजी तरुण मंडळाचे माजी खेळाडू आणि फुलेवाडी क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक व स. ब. खाडे महाविद्यालय (कोपार्डे)चे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अभिजित वणिरे यांनी ‘कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंची अभिवृत्ती त्यांना मिळणाऱ्या सामाजिक, आर्थिक स्तरावरील सुविधा ’ हा एक चिकित्सक अभ्यास करून एक संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यावर शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. ही पदवी बहाल केली. सातत्याने फुटबॉल एक अभ्यास आणि कोल्हापूरचा फुटबॉल खेळाडू सातासमुद्रापार कसा जाऊन देशाचे नाव कसे करेल याकडे सातत्याने कष्ट उपसणारे व्यक्तिमत्त्व म्हणून वणिरे यांच्याकडे पाहिले जाते. या त्यांच्या फुटबॉल खेळाविषयीच्या तळमळीविषयी जाणून घेण्यासाठी साधलेला थेट संवाद.
प्रश्न : कोल्हापूरच्या फुटबॉलपटूंच्या आर्थिक, सामाजिक आणि सोयी-सुविधांवर संशोधन का करावेसे वाटले?
उत्तर : मी स्वत: महाराष्ट्र हायस्कूल येथे क्रीडाशिक्षक म्हणून १३ वर्षे काम केल्यानंतर कोल्हापूरच्या फुटबॉलमधील एक उणीव जाणवली. त्यामध्ये १२, १४, १६, १७, १९ वर्षांखालील शालेय फुटबॉलमध्ये कोल्हापूरचे असंख्य खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सामने जिंकून महाराष्ट्राला देत होते. मात्र, हे खेळाडू वरिष्ठ संघातून खेळताना दिसत नव्हते. त्यातून मग खेळाडूंची कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक, सामाजिक स्तर तपासला. याच वयोगटांतील गोवा, मुंबई, आसाम, पश्चिम बंगाल, ओरिसा, आदी राज्यांतील खेळाडूंचा अभ्यास केला. हे खेळाडू शालेय स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर थेट आयलीग, संतोष ट्रॉफी, ड्युरंड कप आदी नामांकित देशांतील सर्वोच्च स्पर्धा खेळत होते. मग आपले खेळाडू का मागे पडतात, हे पाहिले. यात आपल्या खेळाडूंना काहीच सोयी-सुविधा मिळत नसल्याचे जाणवले, तर याच्याउलट गोवा, मुंबई, पश्चिम बंगाल, ओरिसा येथील खेळाडूंना शूज, किट, टी-शर्ट, फुटबॉलला लागणारे अन्य व्यायामाचे साहित्य, योगा, फिटनेस, डायट, आदी बाबींसाठी खास केलेली व्यवस्था असल्याचे पुढे आले. त्यातून मग मी हा विषय आणखी जाणून घेण्यासाठी बरीच वर्षे अभ्यास केला. त्यातून या विषयावर संशोधनाची गरज भासली.
प्रश्न : आतापर्यंत तुम्ही कोल्हापुरात किती फुटबॉलपटू निर्माण केले ?
उत्तर : शिवाजी तरुण मंडळ व खंडोबा तालीम मंडळाकडून २३ वर्षे फुटबॉल खेळलो. पुढे १९९५ मध्ये मी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून नोकरीस लागल्यानंतर शालेयस्तरावरील ७५०हून अधिक खेळाडू तयार केले, तर स. ब. खाडे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक म्हणून नोकरीस लागल्यानंतर १५०हून अधिक वरिष्ठ स्तरावरील फुटबॉलपटू निर्माण केले आहे, तर पश्चिम विभागीय विद्यापीठ स्तरावरील महिला फुटबॉल संघास प्रथमच विजेतेपदाचा मानही मिळवून दिला. स्थानिक फुलेवाडी क्रीडा मंडळ, ‘खंडोबा-अ’, ‘ब’ या संघांना प्रशिक्षण दिले आहे. मुळातच माझ्या घरात वडील आप्पासाहेब वणिरे हे उत्कृष्ट जुने-जाणते फुटबॉलपटू होते. त्यामुळे घरातच फुटबॉलचे बाळकडू मिळाले. त्यामुळे मला मिळालेला फुटबॉलचा वारसा आणि तंत्रशुद्ध फुटबॉलचे ज्ञान इतरांनाही मिळावे, म्हणून मी या खेळाचे धडे देत गेलो.
प्रश्न : कोल्हापूरचा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी कोल्हापुरात अकॅडमी होणे गरजेचे वाटते का ?
उत्तर : जर्मनीमध्ये मुलांना ८ ते १२ वर्षांच्या कालावधीत केवळ फुटबॉल हा खेळ तंत्रशुद्ध शिकण्यासाठी अकॅडमीत घालतात. या अकॅडमीत एकदा नाव घातले. त्यानंतर त्या पाल्यांची सर्व काळजी आणि त्यांना लागणारे साहित्य, निवास व्यवस्था, आदी सर्व बाबी ती अकॅडमी पाहते. त्यामुळे ही मुले फुटबॉल एके फुटबॉलचा तंत्रशुद्ध अभ्यास करतात. यामध्ये या बालवयातील खेळाडूंना प्रतिदिवस ८० ते १८८० डॉलर्स इतकी रक्कम त्यांच्या कौशल्यावर दिली जाते. त्यातून ही मुले पुढे १८ किंवा १९ व्या वर्षीच देशाचे नेतृत्वही करतात. त्यामुळे कोल्हापूरचा फुटबॉलपटू शालेय स्तरानंतर काहीकाळ वरिष्ठ गटातील स्थानिक स्पर्धा खेळतो आणि पुढे काही कारणाने खेळात सातत्य न राहिल्याने फुटबॉल हा खेळ सोडून देतो. कोल्हापुरात छत्रपती राजाराम महाराजांपासून फुटबॉल जोपासणाऱ्या आणि वाढविणारी शिखरसंस्था असलेली के.एस.ए.ने अशा शालेय स्तरावरील खेळाडूंसाठी फुटबॉलची अकॅडमी स्थापन करावी. जेणेकरून ती परिपूर्ण आणि परदेशी प्रशिक्षकांची सोय असलेली करावी. त्यामुळे आपला कोल्हापूरचा फुटबॉलपटू देशाच्या संघात जाईल.
प्रश्न : कोल्हापुरातील स्थानिक फुटबॉल मंडळांना मैदानाची गरज आहे का ?
उत्तर : कोल्हापुरातील फुटबॉल खेळणाऱ्या पाटाकडील तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, प्रॅक्टिस क्लब, बालगोपाल तालीम मंडळ, फुलेवाडी क्रीडा मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, आदी मंडळांना फुटबॉलची मोठी परंपरा आहे. त्यातून के.एस.ए.च्या माध्यमातून विविध स्पर्धांत ही मंडळे आपले कौशल्य दाखवितात. या मंडळांतील फुटबॉलपटूंना हक्काचे मैदान नाही. शासनाने जर महापालिकेच्या अंतर्गत येणारी गांधी मैदान, दुधाळी मैदान, राजोपाध्ये मैदान, आयासोलेशन मैदान, शास्त्रीनगर, कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान, सासने मैदान या ठिकाणी प्रत्येकी दोन मंडळांची कायमची सरावाची सोय केली तर निश्चित कोल्हापूरचा फुटबॉलपटू संतोष ट्रॉफी, आयलीग, ड्युरंड कप, आदी स्पर्धेत निवडला जाईल आणि देशाचे नाव उंचावेल.
प्रश्न : संशोधनात फुटबॉल खेळाडूच्या अभिवृत्तीबद्दल उल्लेख केला आहे. या अभिवृत्तीचा अर्थ काय आहे ?
उत्तर : या संशोधनात ‘अभिवृत्ती’चा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. अभिवृत्ती म्हणजे एखादा खेळाडू आवडीने फुटबॉल कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता खेळत राहतो. कालांतराने त्याला उच्च प्रशिक्षण मिळते. प्रशिक्षणानंतर तो पुढे काही काळ खेळतो किंवा मध्येच खेळ बंद करतो. हे त्याचे वर्तन म्हणजेच ‘अभिवृत्ती’ होय.
- सचिन भोसले