‘लोकमत’चे नवरात्रीचे थेट प्रसारण सोेशल मीडियावर हिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:49 PM2018-10-20T14:49:25+5:302018-10-20T14:53:25+5:30
लोकमत आॅनलाईनच्या डिजिटल व्यासपीठावरून नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबाबाईची रोजची पूजा आणि रात्रीच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण नऊही दिवस सोशल मीडियावर हिट ठरले. सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि लोकमत डॉट कॉम या आॅनलाईन व्यासपीठांवर जवळपास ९० हजारांहून अधिक दर्शक या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकमत’शी जोडले जात होते. या कालावधीत दोन विशेष व्हिडिओ आणि जोतिबावरील रोजच्या पूजेचा व्हिडिओही सोशल मिडियावर हिट ठरला.
कोल्हापूर : लोकमत आॅनलाईनच्या डिजिटल व्यासपीठावरून नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबाबाईची रोजची पूजा आणि रात्रीच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण नऊही दिवस सोशल मीडियावर हिट ठरले. सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि लोकमत डॉट कॉम या आॅनलाईन व्यासपीठांवर जवळपास ९० हजारांहून अधिक दर्शक या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकमत’शी जोडले जात होते. या कालावधीत दोन विशेष व्हिडिओ आणि जोतिबावरील रोजच्या पूजेचा व्हिडिओही सोशल मिडियावर हिट ठरला.
नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला, त्या दिवसापासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची दैनंदिन पूजा आणि रात्री अंबाबाई मंदिरात निघणारा पालखी सोहळा ‘लोकमत’च्या डिजिटल व्यासपीठावरून थेट प्रसारित करण्यात येत होता. जवळपास ९० हजार दर्शक रोज या उपक्रमाचा लाभ घेत होते. याशिवाय जवळपास १५ हजारांहून अधिकजण हे प्रसारण इतरांना पाहण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करीत होते.
याशिवाय अंबाबाई मंदिराविषयी स्थापत्यकलेच्या अंगाने माहिती देणारा व्हिडिओ, भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी केलेली गर्दी हे व्हिडिओही सोशल मीडियावर हिट ठरले. पुरातत्त्व अभ्यासक योगेश प्रभुदेसाई यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधून अंबाबाई मंदिराची स्थापत्यरचना कशी आहे, याचा विशेष व्हिडिओ प्रसारित केला.
तो आतापर्यंत ५० हजार दर्शकांपर्यंत पोहोचला. तसेच तो ९००० दर्शकांनी इतरांसाठी शेअर केला. रविवारी प्रसारित केलेला भाविकांच्या गर्दीचा व्हिडिओही सर्वाधिक दर्शकांनी पाहिला आणि शेअर केला. याशिवाय नगरप्रदक्षिणेचा व्हिडिओही सोशल मीडियावर हिट ठरला.
शाही सोहळ्याचे थेट प्रसारण
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी विजयादशमीनिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील राजघराण्यामार्फत होणारा शमीपूजनाचा शाही सोहळाही ‘लोकमत’च्या आॅनलाईन व्यासपीठावरून थेट प्रसारित करण्यात आला. या सोहळ्यालाही सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. शाहू छत्रपती यांच्यासमवेत कोल्हापुरातील राजकीय व्यक्तिमत्त्वे या सोहळ्यासाठी उपस्थित होती. परंपरेनुसार होणाऱ्या या शाही सोहळ्याला करवीरकरांची मोठी उपस्थिती असते. हा सोहळा आतापर्यंत २६ हजारांहून अधिकजणांनी पाहिला तर साडेपाच हजार दर्शकांनी शेअर केला. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दसऱ्यानिमित्त काढलेल्या पहाटेच्या संचलनाचा व्हिडिओही २३ हजार दर्शकांनी पाहिला आणि सात हजारांनी शेअर केला.
जोतिबा पूजेच्या व्हिडिओचा आॅनलाईनवर प्रतिसाद
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर नवरात्रीनिमित्त श्री जोतिबाची रोज कमळपुष्पाच्या विविध रूपांत पूजा केली जात होती. ही पूजाही आॅनलाईनच्या ‘लोकमत’च्या दर्शकांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केली जात होती.