‘गोकुळ’साठी नवीद मुश्रीफांचा सहा तालुक्यांचा दौरा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:50+5:302021-04-16T04:23:50+5:30
कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सरसेनापती ...
कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी गेल्या दिवसांत सहा तालुक्यांचा दौरा पूर्ण करून ठरावधारकांबरोबरच त्या त्या गावांतील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांनी विरोधी आघाडीचे प्रमुख ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका पोहोचविण्याचे काम केले आहे.
कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, आजरा, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत त्यांनी दौरा केला. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार नवीद मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच हा दौरा सुरू केला आहे. सकाळी सात वाजता हा दौरा सुरू होतो. स्थानिक कार्यकर्त्यांना आदल्या दिवशी कळविलेले असते. त्यांच्या समवेत ते ठरावधारकांच्या घरी जाऊन विरोधी पॅनेलची भूमिका सांगून, त्यांचे मत आणि म्हणणे ऐकूण घेत आहेत. रोज साधारणतः शंभरभर ठरावधारकांना ते भेटत आहेत. चहा, नाष्टा, दुपारचे जेवण ते ठरावधारकांच्या घरी घेत आहेत. हे सहा तालुके पूर्ण झाल्यानंतर आता इतर तालुक्यांचा दौरा ते करणार आहेत.
चौकट
ग्रामपंचायती, सेवा संस्थांनाही भेटी...
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी प्रचार हाच त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश असला तरी गावात गेल्यानंतर सेवा संस्था, दूध संस्था तसेच ग्रामपंचायतींनाही भेटी देण्याचा आग्रह स्थानिक पदाधिकारी करतात. तेव्हा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून विकासकामांचे प्रस्ताव तसेच जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संबंधित कामे ऐकूण घेऊन त्यांचाही पाठपुरावा ते करीत आहेत. त्यामुळे हा दौरा लक्षवेधी ठरत आहे.
‘गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीची भूमिका प्रत्येक ठरावधारकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्या प्रमुख नेत्यांच्या सूचनेनुसार आपण हा सहा तालुक्यांचा दौरा पूर्ण केला आहे. दूध उत्पादकांमध्ये उत्सुकता आणि आकर्षण आहे. दूध संघाचे खरे आधारस्तंभ असलेल्या दूध उत्पादकांनी आपल्या मागण्या आणि अडचणी उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या आहेत. परिवर्तनाची लाट उघड उघड दिसत आहे. सहा तालुक्यांच्या या दौऱ्याचा अहवाल आमच्या नेत्यांना सादर करणार आहे’.
नवीद मुश्रीफ
कृपया नवीद मुश्रीफ यांचा फोटो वापरावा ही विनंती