Navratri 2024: घटस्थापनेने अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, पहिल्या दिवशी देवीची सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रुपात पूजा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 3, 2024 04:22 PM2024-10-03T16:22:54+5:302024-10-03T16:24:07+5:30
आदिशक्तीचा जागर सुरू : मंदिर भाविकांनी फुलले
कोल्हापूर : काकड आरती, अभिषेक, घटस्थापना, तोफेची सलामी, सालंकृत मनोहारी पूजा अशा धार्मिक विधींनी गुरुवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यादिवशी देवीचे महिषासुराशी युद्ध सुरु झाले त्याचे प्रतिक म्हणून पूजेचे घट बसवले जातात, म्हणून या दिवशी अंबाबाईची बैठ्या रुपात पूजा बांधली जाते. त्यानिमित्त देवीची सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली. आदिशक्तीच्या जागरासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेले.
गुरुवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर देवीचा अभिषेक झाला. सकाळी साडे आठ वाजता मुनिश्वर घराण्यातील परंपरागत पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना झाली. तोफेच्या सलामीने देवीचे घट बसले आणि अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी शासकीय अभिषेक केला.
श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या स्वरुपात बैठी पूजा
दुपारी साडे बाराच्या आरतीनंतर अंबाबाईची श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या स्वरुपात बैठी पूजा बांधली आहे. अंबाबाई ही आदिजननी आहे. तिने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तिने सृष्टी निर्माण केली. सर्वांना धन, धान्य, पशु, पुत्र, कन्या,, पाणी, खत, फळे, फुले, निर्मितीची, सृजनाची क्षमता असेल असे सर्वकाही दिले. श्रीसुक्तामधील अंबाबाई ही हत्ती घोडे, गाईसारख्या पशुंच्या सानिध्याने प्रफुल्लित होते. तिचे आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे पुत्रवत ऋषि सदैव तिच्या सेवेत असतात असा या पूजेचा अर्थ आहे. श्रीपूजक संजीव मुनीश्वर, सुशांत कुलकर्णी, रवि माईणकर, आशुतोष जोशी यांनी ही सालंकृत पूजा बांधली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. आवारात सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिरात उत्साह आणि चैतन्याचे रंग भरले.
भाविकांची सर्वतोपरी काळजी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. सुसज्ज दर्शन मंडप, रांगांमध्ये पिण्याचे पाणी, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड, प्रथमोपचार केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह अशा सोयी आवारात उभारण्यात आल्या आहेत.