कोल्हापूरच्या अंबाबाईचा उद्यापासून नवरात्रौत्सव; मुख दर्शनासाठी तात्पूरता ब्रीज, सीसीटिव्हीचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:11 PM2023-10-14T14:11:46+5:302023-10-14T14:19:15+5:30

भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्यात येत आ्हेत

Navratri Festival of Ambabai of Kolhapur from tomorrow; Provisional Breeze for Mukha Darshan, CCTV Watch | कोल्हापूरच्या अंबाबाईचा उद्यापासून नवरात्रौत्सव; मुख दर्शनासाठी तात्पूरता ब्रीज, सीसीटिव्हीचा वॉच

कोल्हापूरच्या अंबाबाईचा उद्यापासून नवरात्रौत्सव; मुख दर्शनासाठी तात्पूरता ब्रीज, सीसीटिव्हीचा वॉच

कोल्हापूर : आदिशक्तीचा जागर असलेला शारदीय नवरात्रौत्सव उद्या रविवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंदिर परिसराची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

नवरात्रौत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दरवर्षीच्या तुलनेत भाविक संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्यात येत आ्हेत. शेतकरी संघाच्या इमारतीतील दर्शन रांगा तयार झाल्या असून तेथे फॅन, एलईडी स्क्रीन, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंदिर आवारातील मांडव पूर्ण झाला आहे. या सर्व व्यवस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सीसीटिव्हीचा वॉच

अंबाबाई मंदिर व बाह्य परिसरावर ८५ सीसीटिव्हीचा वॉच असणार आहे. तीन दरवाज्यांवर बॅग स्कॅनर बसविण्यात आले आहेत. पोलीसांसह होमगार्डदेखील बंदोबस्तासाठी असणार आहेत.

वैद्यकीय पथकाची सोय

मंदिरात व बाह्य परिसरात चार ठिकाणी वैद्यकीय पथक तैनात असणार आहे. १०८ ॲम्ब्युलन्स असेल. गर्दी वाढली तर संघाच्या इमारतीबाहेरदेखील रांगांची व्यवस्था केली जाणार आहे. दर्शन रांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असेल.

मुख दर्शनासाठी तात्पूरता ब्रीज

मुख दर्शनाची रांग गरूड मंडपातून सोडली जात होती पण आता गरूड मंडप बंद असल्याने भाविकांच्या सोयीसाठी मंडपाबाहेर तात्पूरता पूल उभारण्यात येत आहे.

राष्ट्रवादीतर्फे स्वच्छता

शुक्रवारी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मंदिरबाह्य परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक सुनील पाटील, विनायक फाळके, रेखा आवळे, जायदा मुजावर, पूजा साळोखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पार्कींगची ठिकाणे

प्रायव्हेट हायस्कलू, न्यू हायस्कूल पेटाळा मैदान, गांधी मैदान, मेन राजाराम हायस्कूल, ससुरबाग, एमएलजी हायस्कूल. बांदू चौक, शिवाजी स्टेडियम, शाहु स्टेडियम, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा, पंचगंगा घाट, राखीव पार्कींगची ठिकाणे : आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, एस्तेर पॅटर्न हायस्कूल मैदान, शाहू दयानंद हायस्कूल मैदान.

शमी पूजन(दसरा) दिवशीचे पार्कींग : शहाजी महाविद्यालय, महाराणी लक्ष्मीबाई जिमखाना, पंचायत समिती, मुस्लिम बोर्डींग, चित्रदुर्गमठ

बिंदू चौकात मोबाईल टॉयलेट

इंडोकाऊंट फाउंडेशनच्यावतीने महिला व पुरुषांसाठी दोन स्टेनलेस स्टील मधील मोबाईल टॉयलेट व्हॅन देवस्थान समितीला पुरविण्यात आल्या आहेत. हे व्हॅन बिंदू चौक वाहनतळाच्या ठिकाणी बसवण्यात येणार असून त्यामुळे भाविकांची सोय होणार आहे. यावेळी फाउंडेशनचे संचालक कमाल मित्रा, महाव्यवस्थापक संदीप कुमार, सहायक महाव्यवस्थापक राजेश मोहिते, वरिष्ठ सल्लागार अमोल पाटील, अमर यादव, माजी नगरसेवक आदिल फरास, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सुयश पाटील उपस्थित होते.

Web Title: Navratri Festival of Ambabai of Kolhapur from tomorrow; Provisional Breeze for Mukha Darshan, CCTV Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.