Kolhapur: अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपाचे काम सुरु, यंदाचा नवरात्रोत्सव कुठं होणार..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:16 PM2024-09-03T17:16:43+5:302024-09-03T17:23:04+5:30

गरूड मंडप धोकादायक झाल्याने गेल्या दीड वर्षापासून येथील सर्व धार्मिक सोहळे व विधी बंद करण्यात आले आहेत

Navratri festival of Ambabai will be arranged on the fourth floor of Garud Mandap, the building will be demolished | Kolhapur: अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपाचे काम सुरु, यंदाचा नवरात्रोत्सव कुठं होणार..

Kolhapur: अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपाचे काम सुरु, यंदाचा नवरात्रोत्सव कुठं होणार..

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवातील पालखी साेहळा, नगरप्रदक्षिणेचे सर्व विधी नित्यनेमाप्रमाणे गरूड मंडपाच्या चौथऱ्यावरच होणार आहेत. सध्या मंडप उतरविण्याचे काम सुरू असून, नवरात्रोत्सवापूर्वी येथे सपाटीकरण करून घेतले जाणार आहे. चौथरा तसाच ठेवून भोवतीने मांडव उभारून नवरात्रोत्सव पार पाडला जाईल.

गरूड मंडप धोकादायक झाल्याने गेल्या दीड वर्षापासून येथील सर्व धार्मिक सोहळे व विधी बंद करण्यात आले आहेत. इमारतीचे जुने बांधकाम उतरवून नव्याने उभारले जाणार आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर पूर्ण होऊन गेल्या पंधरा दिवसांपासून गरूड मंडप उतरविण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवानंतर पंधरा दिवसांनी नवरात्रोत्सव सुरू होतो. तत्पूर्वी जुने मंडप पूर्णत: उतरविले जाणार आहे.

मात्र, पालखी सोहळा झाल्यानंतर व नगरप्रदक्षिणेनंतर विश्रांतीसाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती जेथे विराजमान होते, तो चौथरा (कट्टा) तसाच ठेवण्यात येणार आहे. भोवतालच्या जागेचे सपाटीकरण केले जाईल. कट्ट्याभोवती मांडव उभारून अंबाबाईचा नवरात्रोत्सव पूर्ण केला जाईल. त्यानंतर गरूड मंडपाच्या उभारणीला सुरुवात होईल, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

दगड अजून घडतच आहेत..

मणिकर्णिका कुंडाच्या जतन संवर्धनासाठी दगड घडविण्याचे काम संथगतीने अजून सुरू आहे. दुसरीकडे माउली लॉजचे संपादन होऊन कुंडावरील इमारत पाडली जात नाही तोपर्यंत संपूर्ण कुंडाचे जतन-संवर्धन होणार नाही. मात्र, त्यासाठी भूसंपादन विभागाने दरच दिलेला नसल्याने संपादनाचे व कुंडाचेही काम रखडलेलेच आहे. याबाबतीत आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन संपादनाच्या दरासाठी संबंधित विभागाला सूचना करणे गरजेचे आहे.

Web Title: Navratri festival of Ambabai will be arranged on the fourth floor of Garud Mandap, the building will be demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.