Navratri : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 04:42 PM2018-10-17T16:42:19+5:302018-10-17T16:44:11+5:30
शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केल्याने या दिवशी ही पूजा बांधली जाते.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केल्याने या दिवशी ही पूजा बांधली जाते.
नवरात्रौत्सवात अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जगदंबा आदिशक्तीने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केला. त्रिलोकाला त्रास देणारा आसुर या तिथीला संपला; पण त्याहीपेक्षा ५१ शक्तिपीठांच्या यादीत करवीरासाठी ‘करवीरे महिषमर्दिनी’ असा येणारा उल्लेख सार्थ करणारी अशी ही महातिथीची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली. ही पूजा सारंग मुनीश्वर, मंदार मुनीश्वर, मनोज मुनीश्वर यांनी बांधली.
तिरूपती देवस्थानचा शालू अर्पण
दरम्यान, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता तिरूपती देवस्थानने श्री अंबाबाईच्या चरणी शालू अर्पण केला. सोनेरी रंग आणि लाल काठाच्या या शालूची किंमत १ लाख ३ हजार ९०० इतकी आहे. तिरूपती देवस्थानचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह आॅफिसर पी. अशोककुमार, डी. विजयरेखा यांनी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर व सदस्या संगीता खाडे यांच्याकडे हा शालू सुपूर्द केला.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, बी. एन. पाटील-मुगळीकर, सुभाष वोरा, के. रामाराव, संदीप दोशी, निहारिका, सात्त्विका, नित्यवर्धन उपस्थित होते.