नयनरम्य मसाई पठाराचे तरुणाईला आकर्षण
By Admin | Published: October 27, 2014 09:29 PM2014-10-27T21:29:20+5:302014-10-27T23:43:16+5:30
पर्यटकांची संख्या वाढली : इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पांडवकालीन २0 गुहा अस्तित्व टिकवून
किरण मस्कर -कोतोली -पन्हाळगडापासून पश्चिमेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेले मसाई पठार पांडवकालीन लेण्यांनी सजलेले असल्याने पर्यटकांच्या आवडीचे पर्यटन केंद्र बनले आहे.
सुमारे ९१३ एकरांपेक्षा जास्त जागेत विस्तारलेले मसाई पठार पन्हाळगडाजवळच आहे. उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळा पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच मसाई पठाराकडे वळतात. पठारावरील प्रत्येक लहान-मोठ्या दरीत जिवंत पाण्याचे झरे आहेत. रिमझिम पडणारा पाऊस अनुभवण्यासाठी तरुण-तरुणी दुचाकीवरून येथे भेटी देतात. येथील नयनरम्य निसर्ग खुणावत असतो. लहान-मोठ्या दऱ्या, उंच कडे, रिमझिम पाऊस, थंड वारा, दाट धुके हे तर नित्यनियमाने पठारावर पाहायला मिळते. उगवणारी अनेक आकर्षक फुले आणि हिरव्यागार गवताचे गालीचे अशा अल्हाददायक वातावरणामुळे तरुणाईची मसाई पठारावरील सहल म्हणजे एक पर्वणीच असते.
याच पठारावर मसाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. जवळच ऐतिहासिक पांडवदरा असून, जांभळ्या दगडामध्ये कोरलेली पांडवकालीन लेणी लक्ष वेधून घेतात. येथे एकूण २० गुहा आपले अस्तित्व ठेवून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळ असणाऱ्या पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून याच मसाई पठारावरून विशाळगडाकडे प्रयाण केले होते. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात भारतीय छात्रसेनेच्या शिवाजी ट्रेल ट्रेक मोहिमेचा मार्गही या पठारावरूनच जातो, तर शिवप्रेमी संघटनांचा पदभ्रमण मार्गही पन्हाळा-मसाई पठार-विशाळगड असा आहे. पठाराच्या सुरुवातीच्या म्हाळुंगे गावाजवळील शाहूकालीन ‘चहाचे मळे’ प्रसिद्ध आहेत. राजर्षी शाहू महाराजांची ही कल्पना जगप्रसिद्ध असून, इंग्लंडला ‘पन्हाळा फोर्ट टी’ या नावाने चहा पाठविण्याची सोय त्यावेळी शाहू राजे यांनी येथे केली असल्याची माहिती आजही दस्तऐवजात वाचावयास मिळते.
पठारावरील मसाई देवस्थान जागृत असल्याने कोल्हापूरसह सांगली व कर्नाटकमधील भक्त पठारावर येत असतात. मसाई पठाराच्या पश्चिमेला अवघ्याच काही अंतरावर व बांदिवडे गावाच्या डोंगरात प्राचीन काळातील लग्नाच्या वऱ्हाडातील माणसांची दगडी मूर्ती तयार झालेली पाहावयास मिळत असून, आज या पावसात आपल्या अंगावर हिरवा शालू घेऊन एखादी नवी नवरी उभी आहे, अशी ही कुवारणी पाहावयास मिळते.