‘पद्माराजे’त राष्ट्रवादीचा उमेदवार द्या
By admin | Published: August 13, 2015 11:48 PM2015-08-13T23:48:29+5:302015-08-14T00:05:43+5:30
हसन मुश्रीफ : प्रभागातील नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचे आदेश
कोल्हापूर : सध्या शहरातील चर्चेत असलेल्या शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार असलाच पाहिजे, असा आग्रह गुरुवारी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत धरला. काहीही ठरवा, पण राष्ट्रवादीचा उमेदवार या प्रभागात असलाच पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. मुश्रीफ यांनी गुरुवारी सकाळी कागल येथील विश्रामगृहावर ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे, स्थायी समिती सभापती सर्जेराव पाटील, माजी सभापती आदिल फरास, नगरसेवक उत्तम कोराणे, माजी नगरसेवक अजित राऊत, संजय कुऱ्हाडे, संजय पडवळे, आदी कार्यकर्त्यांशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करून आढावा घेतला.
शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान प्रभागात नगरसेविका सुनीता राऊत यांचे पती अजित राऊत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, परंतु स्थानिक वेताळ तालमीच्या राजकारणातून त्यांना थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांच्याऐवजी भाजपचे कार्यकर्ते रामभाऊ चव्हाण यांचे पुतणे अजिंक्य चव्हाण हे निवडणूक लढविणार आहेत. या विषयावरही यावेळी चर्चा झाली. अजित राऊत व उत्तम कोराणे यांच्याशी चर्चा करताना मुश्रीफ यांनी या प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार असलाच पाहिजे, असा आग्रह धरला. माजी नगरसेवक बबनराव कोराणे, रामभाऊ चव्हाण यांच्याशी अजित राऊत, उत्तम कोराणे यांनी चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा, असे सुचविले.
दोन दिवसांत निर्णय होणार
या बैठकीत मुश्रीफ यांनी जर अजिंक्य चव्हाण निवडणूक लढविणार असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीकडून लढावे, अन्यथा त्यांच्याविरोधात अजित राऊत यांनीच पक्षातर्फे उभे राहावे, असे सुचविले असल्याचे समजते. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा, असे मुश्रीफ यांनी सांगितले आहे.