कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा संसार अजूनही दुसऱ्याच्याच घरात, स्वमालकीचे कार्यालय उभारण्यात अपयश
By राजाराम लोंढे | Published: July 6, 2023 06:21 PM2023-07-06T18:21:19+5:302023-07-06T18:22:34+5:30
राष्ट्रवादीचे कार्यालय म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड
राजाराम लोंढे
कोल्हापूर : रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संसार स्वत:च्या कार्यालयाविना दुसऱ्याच्या घरातच सुरू आहे. दोन खोल्यांचे स्वत:चे कार्यालय करण्यात पक्षनेतृत्वाला अपयश आल्याने इतरांच्या उपकारावरच येथे कारभार सुरू आहे. त्यामुळे इतर ठिकाणी पक्ष कार्यालयावरून सुरू असलेला संघर्ष येथे होण्याचा प्रश्नच येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता चांगलाच पेटणार असून पक्ष कार्यालयावरून राडे सुरू झाले आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करत पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या कार्यालयावरून दोन्ही गटांत रणकंदन होणार हे निश्चित आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार होण्याची शक्यता फार कमी आहे; कारण गेल्या २५ वर्षांत येथील प्रत्येक नेतृत्वाने पक्ष कार्यालयासह त्याच्या वाढीस फारसे महत्त्व दिले नाही.
पंचवीसपैकी २० वर्षे पक्ष सत्तेत असूनही त्याला स्वत:चे हक्काचे कार्यालय करता आले नाही. राजकीयबरोबरच संस्थात्मक ताकद असणाऱ्या व्यक्तीकडेच पक्षाचे नेतृत्व राहिले आहे. मात्र, एकाही नेतृत्वाला पक्षाचे दोन खोल्यांचे कार्यालय उभा करता आले नाही, हे नेतृत्वाचे अपयशच म्हणावे लागेल.
राष्ट्रवादीचे कार्यालय म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड
- गेल्या पंचवीस वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व जिल्हा कार्यालयाची अवस्था विंचवाच्या बिऱ्हाडासारखी झाली आहे. स्थापनेवेळी शहर व जिल्हा कार्यालय माजी महापौर आर. के. पोवार यांच्या महाराणा प्रताप चौक परिसरातील निवासस्थानी होते.
- त्यानंतर शहर कार्यालय तिथे राहिले आणि जिल्हा कार्यालय ताराबाई पार्क येथील देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे यांच्या खाडे बिल्डिंगमध्ये गेले. तोपर्यंत शहर कार्यालय जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या मालकीच्या शाहू स्टेडियमच्या गाळ्यात गेले.
- खाडे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर काही महिने जिल्हा कार्यालय जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्या जाधववाडी परिसर येथील घरात गेले. आता ते शाहू मार्केट यार्ड येथील कागल तालुका संघाच्या शेडमध्ये सुरू आहे.
शहर कार्यालय ‘व्ही. बीं’कडेच राहणार
शहर कार्यालयाची जागा ही व्ही. बी. पाटील यांची आहे. त्यामुळे हे कार्यालय त्यांच्याकडेच म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे, तर जिल्हा कार्यालयाची जागा ही कागल संघाची असल्याने ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार, हे निश्चित आहे.