राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा योग नाहीच

By Admin | Published: January 2, 2016 08:29 AM2016-01-02T08:29:30+5:302016-01-02T08:33:36+5:30

जिल्हा परिषदेचे राजकारण : ‘स्वाभिमानी’बरोबर पाच वर्षांचा समझोता, पदाधिकारी बदलास काँग्रेसअंतर्गत नेत्यांचा विरोध

NCP has no yoga power | राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा योग नाहीच

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा योग नाहीच

googlenewsNext

राजाराम लोंढे-- कोल्हापूर --विधान परिषद निवडणुकीतील बदललेल्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदलाची चर्चा जरी सुरू असली, तरी काँग्रेसमधील नेते त्याला तयार नाहीत. राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेत्यांना अंगावर घेऊन सतेज पाटील बदलाचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षे सत्तेत वाटा देण्याचा ‘शब्द’ दिल्याने पदाधिकारी बदल अशक्यच असल्याचे काँग्रेसअंतर्गत चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील हे जरी विजयी झाले असले, तरी या निवडणुकीतील राजकारणाचे सर्वाधिक हादरे काँग्रेसमध्ये बसले आहेत. पहिल्यांदा उमेदवारीवरून काँग्रेसअंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने जोर धरला. त्यात महादेवराव महाडिक यांच्या बंडखोरीमुळे राजकारण चांगलेच उफाळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाने साथ दिल्याने सतेज पाटील यांना विजयापर्यंत पोहोचणे फारसे अवघड नव्हते; पण त्यांना खरी भीती काँग्रेसअंतर्गत राजकारणाचीच होती. राष्ट्रवादी, ‘जनसुराज्य’चे नेते प्रामाणिक राहिले नसते, तर कदाचित वेगळा निकाल लागला असता. हाच मुद्दा पुढे करीत राष्ट्रवादीचे सदस्य जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी आग्रही आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली; पण ही आघाडी जिल्हा परिषदेत का नाही, असा सूर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आळवला होता. विधान परिषद निवडणुकीत पाठिंबा देताना जिल्हा परिषदेची चर्चा झाली. त्यावेळी सतेज पाटील यांनी ‘बघूया,’ एवढेच आश्वासन दिले होते. पदाधिकारी बदलांबाबत प्रदेश काँग्रेसशी बोलण्याचे अधिकार माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांना देण्यात आले आहेत; पण हा निर्णय केवळ कोल्हापूरबाबत होणार नाही. दोन्ही काँग्रेसचे मनोमिलन व्हायचे झाल्यास राज्य पातळीवर व्हावे लागेल. हा विषय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पातळीवर राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका वर्षावर आल्या आहेत. त्यात काँग्रेसअंतर्गत नेत्यांना अंगावर घेऊन बदल करणे तितकेसे सोपे नाही. जरी सव्वा वर्षाने पदाधिकारी बदलाचे ठरले असले, तरी आजपर्यंतचा इतिहास पाहता प्रत्येकाने अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे.


बदल कोणासाठी ?
जिल्हा परिषदेमधील सध्याच्या पदांचे वाटप पाहिले तर प्रकाश आवाडे, सतेज पाटील, भरमूण्णा पाटील यांच्या एका, तर पी. एन. पाटील यांच्या दोन कार्यकर्त्यांना संधी मिळालेली आहे. आता बदल करायचा म्हटला तर कोणासाठी करायचा ? बदल करायचा ठरविल्यास सत्तेचा समतोल साधताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बदल कोणासाठी करायचा ? हा खरा प्रश्न असून, प्रदेश काँग्रेसकडून त्याला सहमती मिळण्याची शक्यता धूसर आहे.


पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची अडचण
काँग्रेस नेत्यांच्या विरोधात जाऊन अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे घेणे तसे कठीण आहे. राजीनामे दिले नाही, तर अविश्वास आणावा लागेल. तेवढे संख्याबळ दोन्ही काँग्रेसचे होईलही; पण निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी जोखीम सतेज पाटील घेतील, असे वाटत नाही.


पतंगरावांनीच दिला होता चर्चेला पूर्णविराम
विधान परिषद निवडणुकीच्या घडामोडीत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करण्याची मागणी आमदार
डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे केली होती. त्यावेळी तुम्ही सांगलीत जयंतरावांना काँग्रेसला सत्तेत घेण्यास सांगा, मग बघूया, असे उत्तर देऊन याविषयाला पूर्णविराम दिला होता.


जिल्हा परिषदेमधील आघाडी वेगळी आणि राज्याचे राजकारण वेगळे असते. अनेकवेळा आम्ही काँग्रेस पक्षाला मदत केलेली आहे, तरीही कोणाच्या तरी आग्रहाखातर बदल करणार व काँग्रेसला ‘स्वाभिमानी’सत्तेत नको असेल, तर तो त्यांनी निर्णय घ्यावा.
- खासदार राजू शेट्टी

Web Title: NCP has no yoga power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.