“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 12:52 PM2021-08-07T12:52:17+5:302021-08-07T12:53:59+5:30
राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
कागल:राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली, यात राजकारण काय आहे, हे माहीत नाही. पण एक मराठी माणूस म्हणून माझ्यासह राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
अदित्य ठाकरे हे अभ्यासू युवा मंत्री आहेत, असेही प्रशस्तीपत्र त्यांनी दिले. कागल येथे निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष चद्रंकात पाटील यांनी जी वक्तव्ये केली, ती चुकीची होती. जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलण्याचे कोणतेही कारण नव्हते. ज्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुर जिल्ह्यातील त्यांचे गाव असलेल्या खानापूरची ग्रामपंचायत जिंकता आली नाही. कोल्हापुर जिल्ह्यात भाजपाची कोठेही सत्ता नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
आमदार होण्यासाठी कोल्हापूर सोडून कोथरूडला पळून गेले. एका महिलेची आमदारकी काढून घेतली. ते चंद्रकांत पाटील शरद पवारांना आम्ही माढातून घरी पाठविले, असे म्हणतात. हे हास्यास्पद आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. शरद पवारांना पराभुत करणारा आणि घरी पाठविणारा अजून जन्माला यायचा आहे. तेव्हा तोंड सांभाळून बोला. पवारांच्या बाबतीत अशी विधाने आम्ही खपवून घेणार नाही, अशा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला.
खासदार संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यांना महानगरपालिका निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान चद्रंकात दादा कसे देऊ शकतात. पाच वर्षे राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री राहूनही तुम्हाला स्वतःचा मतदार संघ का नाही. याचे आत्मपरीक्षण आधी करा, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.