सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:08 AM2024-09-04T09:08:02+5:302024-09-04T09:09:46+5:30

"ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे," अशा शब्दांत पाटील यांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे.

ncp Jayant Patil slams ajit pawar party leader hasan Mushrif in kagal rally speech | सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी

सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी

NCP Jayant Patil ( Marathi News ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांचा पक्षप्रेवश सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. "पवार साहेब हे सगळं कसं जमवतात या विचाराने आमचे विरोधक बुचकळ्यात पडले असतील. पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत. शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो. बरेच लोक पक्ष सोडून गेले. पण लक्षात ठेवा 'जहां पे हम खडे होते हैं, लाईन वहीं से शुरू होती है.' मी आधीही सांगत होतो पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका, कपाळमोक्ष ठरलेला आहे," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात. राजे समरजितसिंह घाटगे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो. पवार साहेब आज स्वतः उपस्थित आहेत हा संदेश कागल विधानसभेला पुरेसा आहे. लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्या सर्वांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कागलच्या इतिहासाची नव्याने सुरुवात होत आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं आहे.

समरजीत घाटगेंवर स्तुतीसुमने

 "राजे समरजितसिंह यांनी गेली १० वर्षे अविरतपणे कार्य केले. कारखाना अतिशय आदर्शपणे चावलेला आहे. सत्ता असो वा नसो कार्यरत राहण्याचा बाणा त्यांनी स्वाभिमानाने जपला आहे. ते व्यवसायाने सीए आहेत. विरोधकांची वजाबाकी त्यांना व्यवस्थितपणे करता येते. हिशोब चोख ठेवणारे राजे समरजितसिंह मतदारसंघात विकास घडवतील हा मला विश्वास आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी घाटगे यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, "ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. इतके सुमार काम करणारा शिल्पकार अद्याप फरार आहे. तो नक्की कोणाचा मित्र आहे? भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटले नाही असा कांगावा करत आहेत. कारण गुजरातचे नाव काढले की सत्ताधारी घाबरत आहेत. त्यामुळेच महराजांचा इतिहास बदलण्याचे पाप करत आहेत. बहुजन समजाच्या विचारांचे राज्य येण्यासाठी पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत आहे. आपला पक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांना तुम्हा सर्वांची साथ हवी आहे," असं आवाहनही यावेळी पाटील यांनी केलं आहे.

Web Title: ncp Jayant Patil slams ajit pawar party leader hasan Mushrif in kagal rally speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.