‘राष्ट्रवादी’चे नेते ‘भाजप’ची गुढी उभारणार : करवीर विधानसभा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:30 AM2018-03-17T00:30:20+5:302018-03-17T00:30:20+5:30

 'NCP leader' to set up BJP ''s seat: Karveer Assembly Constituency | ‘राष्ट्रवादी’चे नेते ‘भाजप’ची गुढी उभारणार : करवीर विधानसभा मतदारसंघ

‘राष्ट्रवादी’चे नेते ‘भाजप’ची गुढी उभारणार : करवीर विधानसभा मतदारसंघ

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोयीच्या राजकारणाला कंटाळून पक्षाला राम राम

भोगावती/ सडोली (खालसा) : जिल्ह्यातील काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या पक्षाची स्थिती मजबूत होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर लागली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील तब्ब्ल ४० गावांतील पाच हजार कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे खंदे समर्थक भाजपची गुढी उभा करण्याच्या तयारीला लागले आहेत.

रविवारी (दि. १८) या मंडळींचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. हळदी (ता. करवीर) येथे या मेळाव्याचे नियोजन केले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष बाबा देसाई, अशा विविध मान्यवरांच्या हस्ते या प्रवेशाचे नियोजन केले आहे.

करवीर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्याच्या राजकारणासाठी सोयीनुसार वापरून घ्यावयाचे या एककलमी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ‘कार्यक्रमा’ला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत परिते मतदारसंघात हंबीरराव पाटील यांना पी. एन. पाटील यांच्या चिरंजीवाच्या समोर बळीचा बकरा बनविण्यासाठी उभा केले होते. भोगवती साखर कारखान्याची सत्ता माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हातात दिली. असा आपल्या सोयीनुसार राष्ट्रवादीचे नेते वापर करून घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकही नेता राहुल पाटील यांच्या विरोधी प्रचार करावा लागतो म्हणून आला नाही, तसेच सभा घ्यावी म्हणून एक आठवडा आम्ही आग्रह करीत होतो; पण कोणी बोलू लागायला तयार नाहीत.

बाबूराव हजारे आणि हंबीरराव पाटील यांच्यातही वाद मुद्दाम चिघळत ठेवला. कारण त्याचा फायदा काँग्रेसला व्हावा ही त्यामागची कारणे होती. राष्ट्रवादी नेत्यांच्या या कोत्या मनोवृत्तीच्या वागण्याला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे बोलून दाखविले जात आहे.

या प्रवेशात ‘भोगावती’चे दोन माजी उपाध्यक्ष नामदेवराव पाटील आणि हंबीरराव पाटील यांचा प्रामुख्याने तसेच करवीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा या प्रवेशात समावेश आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठी
किंमत मोजावी लागणार आहे. भोगावती परिसरात करवीरमध्ये काहीशी दुबळी असणारी राष्ट्रवादी आता पूर्णच लंगडी होणारआहे. कुरुकली आणि हळदी या दोन गावांतील चांगल्या मताचीवजाबाकी होणार आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे, एवढे निश्चित. प्रवेशाच्या या कार्यक्रमाला प्रताप कोंडेकर,आ. सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


प्रामाणिक कार्यकर्त्याचा बळी

जिल्हा परिषदेच्या परिते मतदारसंघातून हंबीरराव पाटील व बाबूराव हजारे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली व उमेदवारीचा वाद पक्षाचे पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्यापर्यंत गेला. हंबीरराव पाटील यांना पक्षातून उमेदवारी दिली; परंतु त्यांच्या प्रचाराला वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली.

भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहा संचालकांना उमेदवारी नाकारण्यात आली व राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. जिल्हा परिषद निवडणुकीत हसन मुश्रीफ व ए. वाय. पाटील यांनी जिल्हा बँकेच्या सोयीच्या राजकारणासाठी प्रामाणिक कार्यकर्त्याचा बळी दिला आहे असा आरोप करून हंबीरराव पाटील यांनी पक्षाला राम राम केला.

गेली सहा महिने तटस्थ असणारे हंबीरराव पाटील व नामदेव पाटील यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजप प्रवेश निश्चित केला असून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यकर्त्यांना मिळणार नेते,
नेत्यांना मिळणार पक्ष
रविवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हळदी (ता. करवीर) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश कार्यक्रम होणार आहे.
या प्रवेशामुळे भोगावती व तुळशी खोऱ्यांतील भाजपमधील कार्यकर्त्यांना नेते मिळणार आहेत, तर नेतेमंडळींना पक्ष मिळणार असल्याने करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

Web Title:  'NCP leader' to set up BJP ''s seat: Karveer Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.