… आणि खा. श्रीनिवास पाटील यांनी दिला शरद पवारांच्या गाडीला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 09:14 PM2022-04-24T21:14:23+5:302022-04-24T21:28:06+5:30
छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले.
दुर्वा दळवी
कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्प सभा शनिवारी पार पडणार होती. पण त्या आधीच छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शरद पवार, शाहू महाराज आणि खासदार श्रीनिवास पाटील गोल्फ कार्टमधून हे प्रदर्शन पाहत होते. या गाडीच सारथ्य गृहराज्यमंत्री सतेज पाटील करत होते.
अर्ध्याहून अधिक प्रदर्शन पाहून झाल्यावर इलेक्ट्रीक गाडीत काही तरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे गाडी काही सुरू होईना. गृहराज्यमंत्र्यांनी थोडा वेळ गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण गाडी काही केल्या सुरू होईना आणि मागे महाराजांसोबत बसलेल्या खासदारांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी गाडीला धक्का देऊन पुढे नेण्याचं ठरलं. तसं खासदार श्रीनिवास पाटील गाडीतून खाली उतरले आणि चक्क गाडीला धक्का देण्यासाठी त्यांनी हात लावला.
वयाची ८० वर्षे पार केलेले श्रीनिवास पाटील यांनी वयाची तमा न बाळगता यावेळी गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यानं कार्यतत्परता दाखवली. गाडीत बसलेले शरद पवार यांना पुढील नियोजित सभेला पोहोचण्यास यामुळे वेळ लागू शकतो हे बरोबर ओळखून खासदारांनी गाडीला धक्का दिला. जमलेल्या नागरिकांनी ही खासदारांची कृती पाहीली नी क्षणभर काय होत आहे हे कुणाला काही समजलं नाही. नंतर मात्र शरद पवार यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहीलं आणि ते सभास्थळी रवाना झाले. श्रीनिवास पाटील यांचा राजकारणात आज ही सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या कृतीमुळे सातारची ताकद ही त्यांनी दाखविली आहे असं म्हणायला हरकत नाही.