कोल्हापूर: कागल नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्षांचा मुश्रीफांना 'रामराम', भाजपमध्ये केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:07 PM2022-08-25T14:07:43+5:302022-08-25T14:20:38+5:30
माळी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हातातील घड्याळ काढून कमळ हाती घेतले.
जहॉगीर शेख
कागल : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात तर माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या टीकाटिपण्णीमुळे वातावरण तापले आहे. यातच आज, गुरुवारी घाटगे गटाने मुश्रीफ यांना जोराचा धक्काच दिला.
कागल नगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माणिक माळी आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी आज मुश्रीफ गटास रामराम करीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील घाटगे यांच्या निवासस्थानी त्यांनी हातातील घड्याळ काढून कमळ हाती घेतले. यावेळी वीरेंद्रसिंह घाटगे प्रमुख उपस्थितीत होते. रमेश माळी यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश माजी मंत्री आमदार मुश्रीफ यांना धक्का देणारा आहे.
माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे यांनी मुश्रीफ गटातून झालेले प्रवेश हे पहिले डोस आहेत. लवकरच बुस्टर डोस देऊ असे भाष्य केले होते. त्यावेळेपासुन रमेश माळी यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. आज त्यावर शिक्कामोर्तब झाला.
रमेश माळी हे गेली पंचवीस-तीस वर्षे कागल शहराच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत. मुश्रीफ गटात काम करतांना स्वातंत्र्य दिले गेले नाही. असा आरोप रमेश माळी यांनी भाजप प्रवेशा दरम्यान केला आहे. यावेळी गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे, राजेंद्र जाधव, युवराज पसारे, बाळासो हेगडे आदी उपस्थित होते.
माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. मात्र मागील काही दिवसापासून समरजित घाटगे यांनी मुश्रीफांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.