हसन मुश्रीफ यांना ईडीने बजावलं समन्स; तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:24 PM2023-03-11T22:24:18+5:302023-03-11T22:25:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा ईडीची धाड पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा ईडीची धाड पडली. कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू होती. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल साडेनऊ तास ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होतं. हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडलं. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि कागलमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सदर कारवाईनंतर आता हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स देखील बजावल्याची माहिती समोर येत आहे. हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी म्हणजेच १३ मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरं जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.
हसन मुश्रीफांवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याचं काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुखांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने १०९ वेळा छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला हा विक्रम मोडायचा असावा ही शक्यता नाकारता येत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही ईडीच्या या कारवाईर आपलं मत व्यक्त केलं आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अशा पद्धतीने भारतात कारवाया केल्या जाणार असतील तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता असल्याची टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.
हसन मुश्रीफ अडचणीत-
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केडीसीसीविरोधात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी जिल्हा उपनिबंधकांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यांचा अहवाल १ मार्च २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकांना प्राप्त झाला. त्यानंतर हे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी डी. टी. छत्रीकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था [लेखापरीक्षण] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार छत्रीकर यांनी बुधवारी संध्याकाळीच बॅंकेला भेट दिली. मात्र, ज्या मुद्द्यांबाबत लेखापरीक्षण करावयाचे आहे त्यातील बहुतांशी दस्तऐवज हा ‘ईडी’ने कुलूपबंद केला असल्याने प्राथमिक माहिती घेऊन ते परतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"