राष्ट्रवादीने पैरा फेडावा
By admin | Published: April 21, 2015 12:04 AM2015-04-21T00:04:59+5:302015-04-23T01:04:00+5:30
गडहिंग्लजला बैठक : प्रकाशराव चव्हाण गटाची मागणी
गडहिंग्लज : विधानसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देऊन केलेल्या मदतीचा पैरा राष्ट्रवादीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फेडावा, अशी मागणी गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व ‘जनसुराज्य’चे नेते प्रकाशराव चव्हाण यांच्या समर्थकांनी येथील बैठकीत केली.गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. निवडणुकीत सत्तारूढ आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी चव्हाण होते. ‘गोकुळ’च्या सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार सदानंद हत्तरकी यांची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, चंदगड पोटनिवडणुकीसह चंदगड, कागल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही आपण ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देऊन विजयी केले आहे. त्याची नोंद नेत्यांनी घ्यावी. गडहिंग्लज कारखान्याचे संचालक चंद्रकांत कांबळे म्हणाले, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर यांना केलेल्या मदतीच्या बदल्यात आमचे नेते चव्हाण यांना जिल्हा बँकेची उमेदवारी देऊन मदतीचा पैरा फेडावा. यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे संचालक बाबूराव मदकरी यांचेही भाषण झाले. बैठकीस संचालक आबासाहेब देसाई व रमेश आरबोळे यांच्यासह ‘गोकुळ’चे ठरावधारक उपस्थित होते. सुभाष चोथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)