राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीची अंतर्गत तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:30 AM2021-02-17T04:30:42+5:302021-02-17T04:30:42+5:30
जहाॅंगीर शेख कागल : आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कागल पालिकेच्या निवडणुकीची अंतर्गत तयारी राष्ट्रवादीच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. गेल्या ...
जहाॅंगीर शेख
कागल : आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कागल पालिकेच्या निवडणुकीची अंतर्गत तयारी राष्ट्रवादीच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय जनता पक्षानेही संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. एका प्रभागात एक उमेदवार आणि निवडून आलेल्या उमेदवारांमधून नगराध्यक्ष निवड असे स्वरूप यावेळी असल्याने प्रबळ आणि स्वतःचा चेहरा असणाऱ्या उमेदवाराला महत्त्व येणार आहे. विविध विकासकामांचा प्रारंभ आणि उदघाटन सोहळे याद्वारे राष्ट्रवादी पक्ष प्रभागाशी संपर्क साधून आहे.
राज्यात आलेले महाविकास आघाडीचे सरकार आणि हसन मुश्रीफ यांना मिळालेले महत्त्वाचे मंत्रीपद यामुळे या गटाचा आत्मविश्वास सध्या बुलंदीवर आहे. महात्मा फुले मार्केटच्या नूतनीकरण प्रारंभ कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे देण्याचे आवाहन केले आहे. सत्तेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रभागनिहाय संपर्क दौरा सुरू केला आहे. त्यांनीही कागलचा गड खेचून आणण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे भाजपकडूनही इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने आहेत. तेदेखील विविध कार्यक्रम आयोजित करून नेत्यांबरोबरच प्रभागातील लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. साधारणतः जुलैअखेर नगरपालिका निवडणुकीची अचारसंहिता लागण्याची शक्यता असून, नोव्हेंबरमध्ये नवे पदाधिकारी पालिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हे सहा सात महिने तयारीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नगरसेवकांची संख्याही एकवीस होण्याची शक्यता आहे. प्रभागरचनाही सत्तेचे गणित मांडणारी असेल, असे चित्र दिसते.
डझनभर स्पर्धा सुरू
इच्छुक उमेदवार हे नेत्यांचे वाढदिवस आणि आपले वाढदिवस याचे औचित्य साधून क्रिकेट, फुटबाॅल, व्हाॅलिबाॅल अशा स्पर्धा भरावीत आहेत. सध्या शहरात लहान-मोठ्या बारा ते तेरा स्पर्धा सुरू आहेत. याशिवाय होम मिनिस्टर, हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम घेतले जात आहेत. तरुण मंडळांसाठी जेवणावळीची ही बेगमी काही प्रभागात सुरू आहे.
तिसऱ्या आघाडीचा प्रयोग..
गेल्यावेळी समरजित घाटगे यांचा चेहरा नवीन होता. लोकांनीही प्रतिसाद दिला; पण हसन मुश्रीफ यांचे मुरब्बी राजकारण भारी पडले आणि किरकोळ मतांनी भाजपचा पराभव झाला. गेल्यावेळी मंडलिक गटाचे चंद्रकांत गवळी मुश्रीफांबरोबर राहिले तसेच रमेश माळी यांच्या पत्नीला दिलेली उमेदवारी या गोष्टी निर्णायक ठरल्या होत्या. कागल ज्युनिअर अखिलेशसिंह घाटगे यांची भूमिका ही सत्तेची समीकरणे बदलू शकते.