कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

By विश्वास पाटील | Published: July 3, 2023 01:14 PM2023-07-03T13:14:47+5:302023-07-03T13:15:17+5:30

मुश्रीफांचे कागलच्या राजकारणात राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही.

NCP will struggle for existence In Kolhapur district, the lack of leadership will be felt | कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या दोनच आमदार होते परंतु ते दोघेही नव्या उलथापालथीमध्ये भाजप-एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मोकळी झाल्याची प्रतिक्रिया उमटली. पण जे भाजपसोबत गेले आहेत, ते आम्हीच खरे राष्ट्रवादी असा दावा करू शकतात. परंतु पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाध्यक्ष शरद पवार यांंना सर्वाधिक बळ देणारा या जिल्ह्यात या पक्षाची स्थिती अस्तित्वासाठी झगडतोय अशी झाली आहे. लोकसभेसाठी दावा सांगणारा हा पक्ष आता विधानसभेसाठी उमेदवार शोधतानाही घामाघूम होईल. एकाच नेतृत्वाच्या हवाली पक्ष केल्याचा हा परिणाम आहे. त्याला पक्षाचेच नेतृत्वही तेवढेच कारणीभूत आहे.

एकेकाळी दिवंगत नेते खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार निवेदिता माने, के. पी. पाटील, बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील, दिग्विजय खानविलकर अशी नेतृत्वाची भक्कम फळी या पक्षात होती. या पक्षाची स्थापनेची महत्त्वाची बैठकच कोल्हापुरात खानविलकर यांच्या घरात झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा गड मानला गेला. दोन्ही खासदार आणि पाच आमदार या जिल्ह्याने या पक्षाला दिले. एकेकाळी पवार यांच्या पुणे जिल्ह्यात जेवढे राष्ट्रवादीचे बळ नव्हते तेवढी ताकद कोल्हापूरने दिली. परंतु नंतर या गडाच्या भिंती गटबाजीने ढासळल्या. मंडलिक की मुश्रीफ यांच्या वादात पवार यांनी मुश्रीफ यांना बळ दिले. 

साधारणत २००७ ला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या लढाईत मंडलिक गटाचा पराभव झाल्यावर राष्ट्रवादीतील मंडलिक-मुश्रीफ वाद विकोपाला गेला. मंडलिक पक्षातून बाहेर पडले व पक्षाची आणखी पडझड झाली. त्यानंतर मात्र मुश्रीफ हेच पक्षाचे सर्वेसर्वा झाले. त्यांनी कागलच्या राजकारणासाठी जे सोयीचे असेल त्यानुसार पक्षाचा वापर केला. संघटनात्मक बांधणीकडे फारसे लक्ष दिले नाही. नव्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. त्यामुळे कागल, चंदगड आणि राधानगरी मतदार संघापुरताच हा पक्ष मर्यादित राहिला. महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, बाजार समितीत पक्षाला सत्तेची संधी मिळाली परंतु त्यातून पक्ष बळकट झाला नाही. 

आताही या तीनच मतदार संघात पक्षाची ताकद आहे. लोकसभेसाठी दोन्ही मतदार संघात पक्षाकडे उमेदवारच नाही. कोल्हापुरात जरा तरी बरी स्थिती पण हातकणंगले मतदार संघात मात्र एकही आमदार नाही. तिथे झेंडा हातात घ्यायला कार्यकर्ते नाहीत. पक्षाच्या या स्थितीस स्वत: मुश्रीफच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पक्ष विस्तारला नाही. गेल्याच महिन्यात स्वत: अजित पवार यांनीच कागल सोडून पक्ष पुढे गेला नाही अशी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. आता त्याच अजितदादांनी मुश्रीफ यांनाच सोबत घेऊन पक्ष बळकट करण्याचे जाहीर केले आहे. नव्या राजकीय उलथापालथी पाहता राष्ट्रवादीत शरद पवार यांच्याकडे कोण-कोण राहते यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहील.

सत्तेचे कायमच बळ..

मुश्रीफ यांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांची पक्ष व नेतृत्वाची निष्ठा ही सर्वात महत्त्वाची मानली गेली. त्यामुळेच पक्षाने त्यांना सत्तेचे कायम बळ दिले. आता त्यांना जरुर मंत्रिपद मिळाले असले तरी कागलच्या राजकारणात त्यांचे राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही.

Web Title: NCP will struggle for existence In Kolhapur district, the lack of leadership will be felt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.